मुंबई, दि.४( punetoday9news):- स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकांच्या अंतिम मतदार यादीत नाव शोधण्यासाठी ऐनवेळी धावपळ होऊ नये यासाठी ‘ट्रू व्होटर मोबाईल ॲप’ची सुविधा आता उपलब्ध होणार आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाचे सचिव किरण कुरुंदकर यांनी दिली.
कुरुंदकर यांनी सांगितले की, मतदार, उमेदवार, राजकीय पक्ष आणि निवडणूक यंत्रणेच्या सोयीसाठी राज्य निवडणूक आयोगाने ‘ट्रू व्होटर’ मोबाईल ॲप विकसित केले आहे. राज्यभरातील विविध 14 महानगरपालिकांच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्यांत नाव शोधण्याची सुविधादेखील अलीकडे उपलब्ध करून देण्यात आली होती. त्याचबरोबर आपल्या नावासंदर्भात काही हरकती किंवा सूचना असल्यास त्याही या ॲपद्वारे नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती.
ट्रू- व्होटर मोबाईल ॲपमुळे मतदारांनी स्वत: प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादीत आपली नावे शोधली व त्यावरील हरकती आवश्यक कागदपत्र व पुराव्यांसह स्वत:च नोंदविल्या. केवळ तीन ते चार दिवसांत असे आक्षेप नोंदविणाऱ्यांची संख्या 2 हजार 770 इतकी होती. त्याचबरोबर या कालावधीत सुमारे पंधरा लाखांपेक्षा जास्त मतदारांनी आपले नाव शोधण्यासाठी या ॲपचा वापर केला. त्यासाठी जवळपास 50 हजारांपेक्षा जास्त मतदारांनी हे ॲप आपल्या मोबाईलवर फोनमध्ये इन्स्टॉल केले. आता आगामी निवडणुकांच्या प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्यांमध्येही या ॲपच्या माध्यमातून आपले नाव शोधता येईल, असेही कुरुंदकर यांनी सांगितले.
Comments are closed