सांगवी,दि.१२ ( punetoday9news) :- जुनी सांगवी येथील जनता शिक्षण संस्थेच्या, मराठी प्राथमिक शाळेमध्ये आषाढी एकादशी निमित्त पालखी सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला .
यावेळी शाळेच्या प्रांगणामध्ये श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या प्रतिमेचे व ग्रंथाचे पूजन शाळेच्या मुख्याध्यापिका कल्पना सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आले . यावेळी शाळेतील मुलांनी संत श्री विठ्ठल, संत रखुमाई , संत निवृत्ती , संत ज्ञानदेव संत सोपान , संत मुक्ताबाई , संत तुकाराम व छत्रपती शिवाजी महाराज यांचे वेश परिधान केले होते.
वारकऱ्यांचा वेश परिधान केलेले विद्यार्थी व नऊवारी साड्या नेसून डोक्यावर तुळशी वृंदावन घेतलेल्या विद्यार्थीनी त्यामुळे सर्व वातावरण भक्तीमय झाले होते . भगव्या पताका, गळ्यात टाळ, कपाळी गंध, भजनात दंग झालेले बाल वारकरी सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले होते. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम …., निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम …राम कृष्ण हरी असा जयघोष करत पालखी सोहळ्याला बहुसंख्य पालक आणि भक्तगण यांच्या उपस्थितीत प्रारंभ झाला शाळेपासून जवळच असलेल्या श्री विठ्ठल मंदिर, महादेव मंदिर, गजानन महाराज मंदिर या ठिकाणी हरिनामाच्या जयघोषात विठू नामाचा गजर करत ही पालखी पोहोचली. त्या ठिकाणी श्रीविठुरायाचे पूजन करण्यात आले. पुन्हा उत्साहात बेटी पढाव बेटी बचाव, झाडे लावा झाडे जगवा , प्लॅस्टीक टाळा पर्यावरण वाचवा , झाडे लावा पाऊस वाढवा ऑक्सिजन वाढवा. अशा प्रकारची घोषवाक्य देऊन झिम्मा फुगड्या घालत आनंदात पुन्हा ही दिंडी शाळेमध्ये पोहोचली त्यानंतर विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले. हा पालखी सोहळा यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षक व पालकांनी सहकार्य केले.
Comments are closed