सर्पदिनानिमित्त सापांविषयी माहिती देणारा लेख.

स्केल्स् अँड टेल्स वाईल्डलाइफ ऍनिमल रेस्क्यु फाउंडेशन,पुणे ह्या संस्थेच्या माध्यमातुन खूप सारे वन्यप्राणी हे लोकवस्तीत अडकलेल्या गंभीर अवस्थेतून वाचवून निसर्गात मुक्त केले गेले आहे. 

प्रामुख्याने लोकवस्तीत सापांचे आढळण्याचे प्रमाण हे जास्तच आहे. आज 16 जुलै आजचा दिवस जगभरामध्ये जागतिक सर्पदिन म्हणून साजरा केला जातो तर ह्याच सर्पदिनानिमित्त आज आपण लोकांच्या मनामध्ये असलेले सापांबद्दलचे काही गैरसमज,अंधश्रद्धा आणि भीती हे सगळं दूर करणार आहोत. भारतामध्ये दर वर्षी जवळ जवळ एक लाख लोकांना सर्पदंश होतो आणि जवळ जवळ पन्नास हजार लोक हे सर्पदंशामुळे मृत्युमुखी पडतात. आपण जर काही गोष्टींचे,नियमांचे पालन केले तर हा आकडा कुठे ना कुठे तरी नक्कीच कमी होईल आता ते कस ते आपण आधी जाणून् घेऊ.
भारतामध्ये जवळ जवळ तीनशे पेक्षा जास्त सर्पजाती आहेत त्यातल्या साठ पेक्षा जास्त ह्या विषारी सर्पजाती आहेत आणि बाकीच्या ह्या बिनविषारी आणि निमविषारी म्हणजे त्या सापांच विष हे फक्त लहान पक्षी,बेडूक,उंदीर अशा प्राण्यांवरच असरदार ठरते मनुष्य आणि मोठ्या प्राण्यांवर नाही.
विषारी सापांमध्ये प्रामुख्याने नाग,मन्यार,घोणस आणि फुरसे ह्या चार जाती आढळतात ज्यांच्या दंशामुळे जर लवकर इलाज नाही झाला तर जीव गमवावा लागू शकतो पण जर साप चावल्यावर काय करावे आणि काय करू नये हे जर समाजामध्ये प्रत्येकाला ज्ञात असेल तर सर्पदंशामुळे कोणीच कधीच मृत्युमुखी पडणार नाही.
आपला भारत देश हा वैज्ञानिक दृष्ट्या प्रगतशील आहे परंतु आजून देखील काही भागामध्ये अंधश्रद्धांवर लोक विश्वास ठेवतात आणि त्याचा परिणाम असा होतो की त्यांची फसवणूक होते किंवा जीव गमवावा लागू शकतो. आजही लोक सर्पदंश झाला की त्या व्यक्तीला इलाजाकरिता मंदिरात किंवा भोंदू बाबा कडे घेऊन जातात पण ह्याचा काहीच उपयोग होत नाही. जर एखादा बिनविषारी साप चावला असेल तर तो व्यक्ती वाचतो आणि त्या लोकांचा आणि त्या रुग्णाचा त्या भोंदू बाबावर जास्त विश्वास बसतो पण तोच जर साप विषारी असेल तर जगातील कोणताही देव किंवा तांत्रिक त्या व्यक्तीचा इलाज करू शकत नाही.
तर सर्पदंश झाल्यावर नेमके काय करावे आणि काय करू नये हे आपण जाणून घेऊ.

सर्पदंश झाल्यास काय करावे –
1) सर्पदंश झालेल्या व्यक्तीला न घाबरावता त्याला आधार द्यावा ज्या अवयवाला दंश झाला आहे तो हृदयापासून लांब अंतरावर स्थिर ठेवावा.
2) अंगठी,जोडवे,कमरेचा पट्टा अशा आवळणाऱ्या वस्तू काढून टाकाव्या जेणेकरून रक्त प्रवाह सुरळीत राहील.
3) सर्पदंश झालेल्या व्यक्तीस हालचाल करून न देता लगेचच् ऍम्ब्युलन्स किंवा एखाद्या चार चाकी वाहनामध्ये बसवून जवळच्या सरकारी रुगणालयात घेऊन जावे.

सर्पदंश झाल्यास काय करू नये –
1) सर्पदंश झालेल्या व्यक्तीस घाबरवू नये घाबरल्याने रक्तप्रवाह वाढून विष हृदयापर्यंत लवकर पोहोचले जाते सर्पदंश झालेला व्यक्ती दगाऊ शकतो.
2) सर्पदंश झालेल्या जागेवर/जखमेवर ब्लेड किंवा कोणत्याही धारधार वस्तूने कापू नये कापलेल्या जागेतून विष परत बाहेर येते हा केवळ गैरसमज आहे .
3) सर्पदंश झालेल्या जागी तोंडाने विष बाहेर ओढण्याचा प्रयत्न करू नये ह्याचा काहीच उपयोग होत नाही तसेच तोंडाने विष ओढणाऱ्या व्यक्तीला जर तोंडामध्ये जखम किंवा अल्सर असेल तर त्या व्यक्तीला देखील घातक ठरू शकते.
4) सर्पदंश झालेल्या व्यक्तीस काही खायला किंवा प्यायला देऊ नये तसेच त्याला झोपू देऊ नये.
5) कोणत्याही प्रकारचा आयुर्वेदिक उपाय करू नये.
6) सर्पदंश झालेल्या रुग्णास तांत्रिक बाबा,मंदिर अशा जागी घेऊन जाऊ नये तंत्र मंत्र,झाडपाल्याचे प्रयोग ह्याचा काहीच उपयोग होत नाही. वेळ न गमावता सर्पदंश झालेल्या रुग्णास लगेच जवळच्या सरकारी रुग्णालायत घेऊन जावे.

सापांबद्दलचे काही गैरसमज.

पहिला गैरसमज असा आहे की साप हा डुक धरून ज्याने कोणी सापाला त्रास दिलाय त्याचा सुढ घेतो सोप्या भाषेत सांगायच झाल तर बदला घेतो. हा निव्वळ एक गैरसमज आहे आणि समाजामध्ये पसरवलेली एक अफवा आहे साप जास्तवेळ गोष्टी लक्षात ठेऊ शकत नाहीत तेवढी त्यांची स्मरणशक्ती नसते.

दुसरा गैरसमज म्हणजे सापांच्या अंगावर केस असतात, पहिली गोष्ट साप हे सरपटणारे प्राणी म्हणजे रेपटाईल्स असतात सस्तन प्राणी नाही सस्तन प्राण्यांच्या शरीरावर केस असतात सापाच्या अंगावर खवले असतात त्यामुळे केस उगण्याचा लांब पर्यंत काहीच संबंध येत नाही.

तिसरा गैरसमज असा आहे की मांडूळ ह्या जातीचा साप हा विकून कोट्याधीश होऊ शकतो,मांडूळाला दोन तोंडे असतात,तो सहा महिने एका तोंडाने तर सहा महिने दुसऱ्या तोंडाने चालतो,मांडूळ सापाचा उपयोग करून पैशाचा पाऊस पाडू शकतो तर हे असे काही गैरसमज मांडूळ ह्या सापाबद्दल समाजात आहेत,मांडूळच नाही तर कोणत्याही भारतीय सर्पजातीची कोणी खरेदी विक्री करू शकत नाही, डांबून ठेऊ शकत नाही वन्यजीव अधिनियम 1972 नुसार हा खूप मोठा गुन्हा ठरतो. तसेच मांडूळाच्या शेपटीचा आकार हा त्याच्या तोंडासारखा असतो त्यामुळे दोन तोंड असल्यासारखे दिसते पण मुळात मांडूळाला एकच तोंड असते आणि त्यामुळे सहा महिने ह्या बाजूने आणि त्या बाजूने चालण्याचा देखील प्रश्न उद्भवत नाही. अंधश्रद्धेपोटी काही लोक मांडूळाचा वापर वेगवेगळे जादूचे प्रयोग करण्यासाठी करतात.  तांत्रिक,भोंदू बाबा हे भोळ्या,अशिक्षित लोकांची फसवणूक करतात मांडूळाचा वापर करून पैशाचा पाऊस पाडू शकतो असा गैरसमज लोकांच्या मनामध्ये भरला जातो आणि ह्या सगळ्या कारणांमुळे मांडूळ ह्या सापाची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. दुर्मिळ होत चालली आहे.
चौथा गैरसमज म्हणजे धामण सापाच्या शेपटीमध्ये विषारी काटा असतो,धामण शेपूट मारते त्यामुळे जीव जातो,धामण साप जनावराच्या गोठ्यात शिरून गाई,म्हैस अशा जणावराचे दूध पितो तर ह्या सगळ्या गोष्टी फक्त आणि फक्त माणसाने पसरवलेल्या भाकडकथा आहेत.जगातला कोणताच साप हा दूध पित नाही ह्याच कारण म्हणजे साप सस्तन प्राणी नाही सापाचे जन्मलेले नवजात पिल्लू देखील पहिल्या दिवसापासून स्वतः शिकार करून आपले अन्न खाते. दुधामध्ये काही असे घटक असता जे सरपटणाऱ्या प्राण्यांना पचत नाहीत त्यामुळे कालांतराने त्या सापाचा मृत्यू होतो. खेळ दाखवणारे गारुडी हे त्यांच्या पेटाऱ्यातल्या सापाला उपाशी ठेवतात आणि त्यामुळे सापासमोर दूध ठेवले की तो नाईलाजाने भुकेमुळे पितो काही दिवसांनी त्या सापाचा मृत्यू झाला की गारुडी तो साप फेकून देऊन दुसरा आणतो अशा प्रकारे सर्पहत्या हा गंभीर गुन्हा केला जातो. तसेच धामण हा भारतामद्ये जर काश्मीर सोडला तर सगळीकडे सापडतो आणि हा पूर्णपणे बिनविषारी साप आहे त्यामुळे शेपटीमद्ये विषारी काटा असण्याचा देखील प्रश्न उद्धवत नाही.
पाचवा गैरसमज म्हणजे अजगर हा साप माणसांना देखील खातो, तर भारतीय अजगर हा भारतामध्ये आढळणारा सर्वात मोठा आणि शक्तिशाली बिनविषारी साप आहे जवळ जवळ अठरा ते वीस फुटापर्यंत वाढू शकतो. लांबीला जरी मोठा असला तरी तो मानवी शरीराला खाऊ शकत नाही आपल्या शरीरातील खांद्यामुळे त्याला माणसाला खाने अशक्य होते मोठा अजगर हा माणसाला आवळून जीवे मारू शकतो पण खाऊ शकत नाही.
सहावा गैरसमज म्हणजे नाग हा पुंगी, बासरीच्या तालावर नाचतो, त्याच्या डोक्यामध्ये नागमनी असतो,तर नागाला जर तुम्ही बघितले असेल तर मानेभोवती असलेले स्नायू फुगवून म्हणजेच सुंदर असा फना काढून शरीराचा अर्धा भाग वर उचलून जोरात फुसकारत उभा राहतो. ह्याच कारण म्हणजे समोर एखादा मोठा प्राणी किंवा माणूस आला तर त्याने घाबरून लांब जावे म्हणजे ती एक वॉर्निंग असते की माझ्या जवळ कोणी येऊ नका मला मारायचा, त्रास देण्याचा प्रयत्न करू नका. नागच नाही तर जगातल्या कोणत्याच सापाला ऐकू येत नाही, सापाला कानच नसतात. सापाला एखादा मनुष्य किंवा प्राणी येतोय हे त्या व्यक्तीच्या किंवा प्राण्याच्या चालण्याचे जमिनीवर जे कंपन होते त्यावरून समजते. मग ज्या प्राण्याला कानच नाही तो प्राणी पुंगी, बासरीच्या आवाजावर कसा नाचू शकेल? कसा डोलू शकेल? हे तुम्हीच सांगा. नाग हा हालचालीला प्रतिसाद देत असतो आणि तुम्ही जर गारुड्याला खेळ करताना पाहिले असेल तर तो बासरी वाजवतो कमी पण त्याची हालचाल जास्त करतो त्यामुळे नाग हा त्या गारुड्याच्या हाताच्या हालचालीकडे आकर्षित होऊन त्या हालचालीला प्रतिसाद करतो आणि लोकांना वाटते की सापच बासरीच्या तालावर डोलत आहे. नागमनी बद्दल सविस्तर बोलायचं झाल तर हा देखील एक गैरसमजच आहे गारुडी नागाच्या डोक्याजवळ कापून त्याच्या त्वचेमध्ये एक कोणताही रंगीत लहान खडा किंवा काचेचा लहान तुकडा आत ठेवून परत शिवतात आणि लोकांना परत तो काढून दाखवतात आणि नागमनी आहे अस सांगतात. आज समाजामद्ये एका बाजूला नागपंचमी दिवशी नागाची पूजा करतात आणि इतर दिवशी साप दिसला की त्याची हत्या केली जाते,सापाला मारणे हा पर्याय नाही निसर्गाचा समतोल राखून ठेवण्यासाठी आपण सापांना वाचवले पाहिजे.
आज गारुड्यांचे खेळ सर्वत्र बंद करण्यात आले आहेत. गारुड्यांच्या ह्या खेळांमुळे खूप सर्पजाती संपुष्टाच्या मार्गवर आल्या आहेत.

असे प्रकार जर कोणाच्या नजरेस पडले तर तात्काळ 1926 ह्या क्रमांकावर संपर्क कारून वनविभागाला घटनेची माहिती द्यावी किंवा जवळील प्राणीमित्राला संपर्क करून त्याची मदत घ्यावी.
तसेच घराच्या अवती भोवती जर साप दिसला तर  त्याला जाऊ द्या, मारायचा प्रयत्न किंवा स्वतः पकडण्याचे धाडस करू नये . तात्काळ वनविभागाला किंवा जवळील प्राणीमित्राला संपर्क करून त्यांची मदत घ्यावी.
सापांच्या बाबतीत असे खूप सारे गैरसमज आहेत जेवढे सांगायचे तेवढे कमीच पण ही सगळी माहिती वाचून आज जागतिक सर्पदिनानिमित्त ह्या निसर्गाच्या एका मौल्यवान,अविभाज्य घटकाच्या बाबतीत म्हणजेच सापाच्या बाबतीत जे काही गैरसमज असतील ते नक्कीच कमी होतील ही अपेक्षा.

लेखन / माहिती स्त्रोत –  स्केल्स अँड टेल्स वाइल्डलाईफ ऍनिमल रेसक्यू फॉउंडेशन,पुणे.

 

 

 

 

Comments are closed

error: Content is protected !!