पिंपरी, दि. २३( punetoday9news):-

सलग ५ वर्षे गणेशोत्सव साजरा करणाऱ्या पारंपरिक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने देण्यात येणारे विविध परवाने या वर्षीपासून पुढील ५ वर्षांकरीता देण्यात येणार असल्याची घोषणा आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांनी केली.

गणेशोत्सवाबाबत महापालिका तसेच शासनाच्या वेळोवेळी निर्गमित होणा-या अटी व शर्तीस अधीन राहून खाजगी जागेत गणेशोत्सव साजरा करणाऱ्या पारंपरिक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला या परवानग्या दिल्या जाणार आहेत.

          यावर्षी राज्यात गणेशोत्सव उत्साहात साजरा होणार आहे. या उत्सवाला पिंपरी चिंचवड शहरातही मोठी परंपरा आहे. महापालिकेच्या वतीने या उत्सवानिमित्त शहरात विविध सोयी सुविधांचे व्यवस्थापन केले जाते. सार्वजनिक गणेश मंडळे मंडप, अग्निशमन आदी विविध परवानगी मिळण्याकरीता महापालिकेकडे अर्ज करीत असतात. त्यानुसार  सार्वजनिक गणेश मंडळांना महापालिकेकडून विविध परवानग्या देण्यात येतात. यासाठी गणेश मंडळाच्या प्रतिनिधींना परवाना घेण्यासाठी महापालिका कार्यालयात दरवर्षी अर्ज करावा लागतो.  मात्र यावर्षी आयुक्त पाटील यांनी खाजगी जागेत मंडप उभारून गणेशोत्सव साजरा करणा-या  पारंपरिक सार्वजनिक गणेश मंडळांना पुढील ५ वर्षांसाठी एकदाच परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे महापालिकेकडील परवाना घेण्यासाठी त्याच कारणासाठी अशा मंडळांना पुढील ५ वर्षांपर्यंत अर्ज सादर करावे लागणार नाहीत. त्यामुळे या मंडळांचा  वेळ वाचणार आहे. यावर्षी या मंडळांना रितसर अर्ज सादर करून परवानगी घ्यावी लागणार आहे. महापालिका आणि शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या अटी शर्तीस अधीन राहून पुढील  ५ वर्षासाठी यावेळी महापालिकेकडून परवाना दिला जाणार आहे. परवाना देताना महापालिकेने दिलेल्या अटी शर्तींचे पालन करणे संबंधित मंडळाला बंधनकारक असणार आहे.

 दरम्यान, नागरिकांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी केले आहे. शाडू मूर्ती अथवा तुरटीच्या किंवा  कागदी लगद्यापासून बनविलेल्या पर्यावरणपूरक, विघटनशील मूर्तींचा वापर करावा.  लाकूड, दगड यापासून बनविलेल्या पुनर्वापर करता येणाऱ्या मूर्तींचा वापर करावा, असेही आयुक्त पाटील म्हणाले.

 गणेश विसर्जनाच्या ठिकाणी  सफाई कर्मचाऱ्यांसह सुरक्षा, अग्निशमन, आरोग्य सेवक, जीवरक्षक कम मदतनीस, आपत्ती व्यवस्थापन पथकाची नेमणूक करण्यात येणार आहे. विसर्जन आणि आवश्यक त्या ठिकाणी निर्माल्य कुंड ठेवण्यात येणार आहे.

नागरिकांनी निर्माल्य व पूजा साहित्य नदीपात्रात अथवा तलावात न टाकता निर्माल्य कुंडातच टाकावे. विसर्जनाच्या ठिकाणी कचरा, उरलेले सजावटीचे व पूजेचे साहित्य तसेच इतर साहित्य जाळू नये व इतरत्र टाकु नये.

 याठिकाणी मूर्ती संकलनासाठी  फिरते रथ ठेवण्यात येणार आहेत. सार्वजनिक गणेश मंडळांनी आरोग्य विषयक, सामाजिक संदेश तसेच स्वच्छता विषयक जाहिराती प्रदर्शित करण्यास पसंती द्यावी. त्याच बरोबर आरोग्य विषयक उपक्रम, रक्तदान शिबीरे आयोजित करण्यास प्राधान्य द्यावे. भारतीय स्वातंत्र्याच्या  अमृत महोत्सवाचे औचित्य साधून देशभक्तीपर देखावे आणि कार्यक्रमाचे आयोजन करावे. हर घर तिरंगा या उपक्रमात सहभाग घेऊन नागरिकांनी आपल्या घरावर देशाचा राष्ट्रध्वज फडकवावा, यासाठी गणेश मंडळांनी जाणीव जागृती मोहिमेत सहभाग घेऊन आपले योगदान द्यावे,  असे आवाहन देखील आयुक्त पाटील यांनी केले आहे.

वाढत्या महागाईची झळ सर्वसामान्य नागरिकांना जाणवतेय का?

View Results

Loading ... Loading ...

 

 

Comments are closed

error: Content is protected !!