पुणे :- काल मोठ्या थाटामाटाने ऑनलाईन पद्धतीने जिओ नेटवर्क चे प्रमुख मुकेश अंबानी यांनी 5G ची घोषणा केली. कदाचित ग्राहकांना २०१६ ची 4G क्षेत्रात क्रांती ची घोषणा आठवली असेल. या नंतर ग्राहकांनी दुकानाबाहेर रांग लावत या नेटवर्कची निवड केली खरी पण घोषणांनी फक्त निवडणुका लढवल्या जातात दूरदर्षी व्यवसाय नाही. इतर कंपन्यांचे ग्राहक हस्तगत करण्यात कंपनी बऱ्यापैकी यशस्वी झाली. ग्राहकांना कमी किंमतीत सेवा मिळत आहे एवढा विचार पुरेसा होता. अगदी माॅल मधल्या सेल सारख. सुरूवातीला कमी दर ठेवत फक्त ग्राहक मिळवून प्रतिस्पर्धी कंपन्यांचे कंबरडे मोडण्याची योजनाही यशस्वी झाली पण यात ग्राहकांची मात्र निराशा झाली. कारण ज्या पध्दतीने जाहिरात करून इंटरनेटचे हायस्पीड सुविधा उपलब्ध करण्यात येतील असे सांगण्यात आले ते फक्त TV ॲप पुरते मर्यादित राहिले इतर सेवेत मात्र 4G नेटवर्क म्हणावे असे वाढलेच नाही. आजही शहरी भागात जिओ चे नेटवर्क नावालाच असून इंटरनेट ॲक्सेस मिळत नाही असे ग्राहकांचे मत आहे. कदाचित ग्राहकांची व वापरकर्त्यांची वाढती संख्या हे त्यामागील कारण असू शकेल मात्र ग्राहक वाढूनही कंपनी चांगली सुविधा उपलब्ध करून देण्यात अपयशी ठरली हे अपयश नाकारता येत नाही.
असेच काहीसे एअरटेल चे म्हणावे लागेल तुलनेने कंपनीने 2G सुविधा चालू ठेवल्याने जेष्ठ नागरिक व ग्रामीण भागातील ग्राहक शाबूत ठेवले गेले मात्र भारतातील सर्वात चांगली नेटवर्क सेवा म्हणून कंपनीने स्वतः च स्वतःची पाठ थोपटून घेतल्याचा प्रकार झाला. एका मुलीला घेवून केलेली जाहिरातच टीकेची धनी ठरली . नंतर त्यात सुधारणा करत इतर कंपन्यांच्या तुलनेने चांगली सेवा असा दावा केला गेला तो काही अंशी खरा असला तरी परदेशातील 4G नेटवर्कच्या तुलनेत नक्कीच मागासलेले नेटवर्क म्हटले तर अयोग्य ठरणार नाही.
आयडिया कंपनीने तर कित्येक आयडिया फक्त जाहिरातीतच चालवल्या. कोट्यवधी रुपये खर्च करून जाहिराती करण्यापेक्षा तेवढे मोबाईल टाॅवर खेडोपाडी उभारले असते तर कंपनीस वाईट दिवस पहावे लागले नसते. एकेकाळी सर्वांत जबरदस्त नेटवर्क म्हणून मिळालेले वास्तविक वैभव हे उत्तम सेवेचे सातत्य न राखल्याने गमवावे लागले.
आज वोडाफोनशी करार करून मोडकळीस आलेल्या इमारतीस आधार देण्याचा प्रयत्न अपुरा ठरत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे कोणतीही कंपनी असो, ग्राहकांना सेवा देण्यासाठी कमजोर ठरल्यास ग्राहक पाठ फिरवतात याची ही सत्य उदाहरण आहेत.
यात काही नेटवर्क कंपन्या एअरसेल , डोकोमो, युनीनाॅर , टेलीनाॅर व इतर तर आल्या तशाच गाशा गुंडाळून गेल्या.
बीएसएनएलची तर गोष्टच न्यारी म्हणावी लागेल भारतातील प्रचंड मोठ्या प्रमाणात विस्तारलेल जाळं असतानाही काळानुरुप बदल करून न घेतल्याने मागे राहीलेली कंपनी म्हणावी लागेल. व्यवसायाच्या दृष्टीने शेतकऱ्यांची संख्या पाहून कंपनीने किसान कार्ड सारखी योजना आणली पण शेजारी असलेली व्यक्तीसुद्धा नेटवर्क च्या बाहेर असल्याचे फोन लावणाऱ्याला ऐकायला मिळते अशी धारणा लोकांच्यात अनुभवातून पसरली. मात्र अजुनही ही कंपनी डोंगराळ भागात चांगली सूविधा देत आहे. पण सर्व स्तरावर विचार करता स्पर्धेत खूपच मागे असल्याचे चित्र आहे.
आज जिओ नेही केलेल्या घोषणा शहराच्या नागरिकांना ग्राहक रूपात ग्राह्य धरून लागू केल्या असल्यातरी शहरातही नेटवर्कचे तीन तेरा अशी अवस्था आहे. नेटवर्क चे काम चालू आहे लवकरच पूर्ण होणार अशा उत्तराने ग्राहकांचे समाधान होत नाही तर उत्तम सेवेने होते कदाचित भविष्यात नवीन कंपनीने येवून सर्वोत्तम नेटवर्क दिल्यास जमा केलेले ग्राहक गायब व्हायला वेळ लागणार नाही हे सत्य स्विकारावे लागेल.
आज लाॅकडाऊन मध्ये ऑनलाईन शिक्षणावर भर असताना सर्व नेटवर्क कंपन्यांची तुलना करता चांगले नेटवर्क म्हणून एअरटेल चांगली पेक्षा बरी म्हणण्याइतकी सुविधा देत आहे तर जिओ, आयडिया, वोडाफोन अशा कंपन्यांचे नेटवर्क वापरणाऱ्या ग्राहकांची निराशा होताना दिसत आहे.
त्यामुळे 5G चा चंद्र जरी चांगला दिसत असला तरी प्रत्यक्षात प्रकाश देईल का? की 4G चंद्राच्या चंद्रकलेनुसार फक्त दिखाऊ राहील हे औस्तुक्याचे ठरेल.
– सागर झगडे ,punetoday9news
Comments are closed