पुणे दि.२८( punetoday9news):- कारगिल युद्धात शहीद सैनिकांच्या बलिदानाविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सैनिक कल्याण विभागाच्यावतीने कारगिल विजय दिवस साजरा करण्यात आला.
यावेळी कारगिल युद्धामध्ये तसेच अन्य शहीद सैनिकांच्या वीरपत्नी, वीरमाता, वीरपिता तसेच अपंगत्व प्राप्त जवान यांचा सत्कार करण्यात आला.
सैनिक कल्याण विभागाच्या हिरकणी हॉलमध्ये आयोजित या कार्यक्रमाला हेडक्वार्टर पुणे सब एरियाचे कर्नल मंदार सतवालेकर, सैनिक कल्याण विभागाचे प्रभारी संचालक लेप्टनंट कर्नल रा. रा. जाधव, जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाचे उपजिल्हाधिकारी अजय पवार, बोनिसा वर्ल्डचे संस्थापक संकेत बी. बियाणी, एस. के. एफ. लिमीटेड मित्र परिवारच्या रेणुका नायडू आदी उपस्थित होते.
जिल्ह्यातील शहीद सैनिकांच्या वीरपत्नी, वीरमाता, वीरपिता तसेच अपंगत्व प्राप्त जवान यांना ‘एस. के. एफ. लिमीटेड’ संस्थेकडून स्मृतीचिन्ह, पुस्तक व भेटवस्तू’ व ‘बोनिसा वर्ल्ड’ संस्थेकडून ‘एक इंडिया मिशन रिंग’ भेट देत सत्कार करण्यात आला. सैनिकांप्रती आदर म्हणून मानपत्राचे वाचन करण्यात आले.
कारगिल युद्धातील शहीद जवानांच्या वीरपत्नी, वीरपिता तसेच युद्धातील जखमी जवान यांच्या सत्काराअंतर्गत वीरपत्नी छाया शंकर शिंदे, वीरपिता दत्तात्रय बानाजी रास्ते, प्रकाश परशुराम चव्हाण, जखमी सैनिक हवलदार संतोष मारूती पिसाळ, नायक शरद बाजीराव गायकवाड, नायक नारायण लक्ष्मण शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. तसेच वीरपत्नी जयश्री गौतम धनावडे, कांचन प्रदिप सरोदे, कल्याणी महादेव खटाटे, दिपाली विजय मोरे, मिरा माणिकराव मुराडे, सविता शंकर बारकुल, पपिता आनंदराव पाटील, सुमन जालिंदर पाटील, प्रतिभा मोहन खटके, सुनंदा दत्तात्रय भोसले, सोनाली सौरभ फराटे, ज्योती राजेंद्र जगदाळे या वीरपत्नींचा तर मधुकर हणमंत बोकील या वीरपित्याचा यावेळी सत्कार करण्यात आला.
कर्नल सतवालेकर, बियानी यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास माजी सैनिक, त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.
Comments are closed