● नो पार्किंगच्या बोर्ड शेजारीच वाहने पार्क ; नियमांची ऐशीतैसी.
● कृष्णा चौकात ड्रेनेजचे काम चालू असताना मुख्य रहदारीच्या चौकाच्या ठिकाणी पार्किंगला परवानगी कशी ?
● सांगा आम्ही चालायचं कुठून ? पादचाऱ्यांचाही संतप्त सवाल.
नवी सांगवी,दि. २३( punetoday9news):- पिंपरी-चिंचवड शहरातील नवी सांगवी येथील कृष्णा चौक येथे सायंकाळी वाहतुकीची प्रचंड कोंडी होत असताना या ठिकाणी कित्येक वाहनचालक आपली वाहने भर रस्त्यात पार्क करताना दिसतात. त्यामुळे वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होतो. यावर कारवाई करण्याची मागणी सामान्य नागरिकांतून होत आहे.
एकीकडे पावसामुळे चौकातच निर्माण झालेले खड्डे व ड्रेनेजचे चालू असलेले काम यामुळे या ठिकाणी वाहतूक संथ गतीने होत असते. त्यात या मद्यपी वाहनवीरांच्या मद्याच्या मोहापाई चक्क मुख्य रस्त्यावरच पार्क केलेल्या वाहनांमुळे अगदी साई चौकापर्यंतही ट्रॅफिक जॅम होते.
कृष्णा चौक ते काटेपुरम चौक दरम्यान सम विषम अशी वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था केली आहे त्यामुळे कित्येक वाहनचालकांना शिस्तही लागल्याचे स्थानिक नागरिक व व्यावसायिक खाजगीत बोलत आहेत मात्र वाहतूक विभागाकडूनच कृष्णा चौक येथे नियमांची पायमल्ली होत असल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.
एकीकडे नो पार्किंग चा बोर्ड लावला असून त्यावर दोन्ही बाजूला जवळपास 100 मीटर पर्यंत पार्किंग न करण्याचा उल्लेख आहे व अगदी दहा मीटरच्या आतच दुसरा पार्किंगचाही बोर्ड आहे त्यामुळे वाहन चालक गोंधळताना दिसतात. कृष्णा चौकात मागील काही दिवसांपूर्वी पावसाच्या पाण्याचा निचराच न झाल्यामुळे गुडघाभर पाणी साचून चौकास तळ्याचे रूप आले होते. त्याची दुरूस्ती म्हणून या चौकातील ड्रेनेज लाईनचे पुन्हा काम करण्यात येत आहे. त्यामुळे येथे सायंकाळी वाहतुक ही संथ गतीने होत असते त्यात या भररस्त्यातील पार्क केलेल्या वाहनांची भर पडत आहे.
बिनधास्तपणे नो पार्किंग बोर्ड शेजारीही वाहने पार्क केली जात असल्याने कित्येकदा कृष्णा चौक ते साई चौक पर्यंत ट्रॅफिक जाम होते त्यामुळे तेथील नो पार्किंगचा बोर्ड हा नक्की कशासाठी असाही प्रश्न इतर वाहनचालक उपस्थित करतात. तसेच या ठिकाणी असणारे वाहतूक पोलीस ही कसलीही कारवाई न करता अशा वाहनांना पार्किंगची सोयच उपलब्ध करून देतात का? असा प्रति प्रश्नही नागरिक उपस्थित करत आहेत.
दुसरीकडे स्मार्ट सिटी ची कामे सुरू होऊन कित्येक महिने लोटले असले तरीही आज जेष्ठ नागरिक, लहान मुले यांच्यासाठी पदपथ फक्त नावालाच असल्याची तक्रारही नागरिक करत आहेत. लाखोंचा खर्च करून चकचकीत पदपथ बनवले खरे मात्र त्यावरील वाढते अतिक्रमण पाहता ते पदपथ पादचार्यांसाठी की स्थानिक दुकानदारांसाठी ? की वाहन पार्क करण्यासाठी ? असा प्रश्नही उपस्थित होत आहे. त्यामुळे नवीन पदपथासाठी केलेला खर्च हा वायाला तर जात नाही ना ? हेही प्रशासनाने पहायला हवे.
वाहतूक विभागाकडून सदर ठिकाणाच्या आसपास सायंकाळच्या वेळेसाठी नो हाॅल्ट, नो पार्किंगचा तात्पुरता बोर्ड लावणे गरजेचे आहे. जेणेकरून वाहतुकीचा खोळंबा होणार नाही.
कृष्णा चौकात मोठी बाजारपेठ असून तेथे नेहमीच नागरिकांची वर्दळ असते. मोठी इलेक्ट्रॉनिक दुकाने, हाॅटेल्स व राजकीय कार्यालय या ठिकाणी असल्याने या चौकास विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. मात्र या वाहतूक व्यवस्थेच्या व पदपथावरील अतिक्रमण या दुर्लक्षपणाने येथे बकालपणा वाढत आहे.
प्रतिक्रिया:-
स्वातंत्र्याच्या 75 वर्षानिमित्त मोठ्या थाटमाटात नवी सांगवी, पिंपळे गुरव येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात आला. मात्र पिंपरी चिंचवड सारख्या मोठ्या शहरातही आज नागरिकांना चालण्यासाठी सुसज्ज मोकळे पदपथ उपलब्ध नाहीत ही शोकांतिका आहे.
– सुनिता शिंदे ,जेष्ठ नागरिक.
कृष्णा चौकातील नो पार्किंग च्या बोर्ड शेजारी पार्क होणाऱ्या वाहनांवर कारवाई करून वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी प्रयत्न केले जातील तसेच नो पार्किंग व सम विषम पार्किंगचा बोर्ड शेजारी असेल तर तोही बदलला जाईल.
– प्रसाद गोकुळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सांगवी वाहतूक शाखा.
Comments are closed