पुणे, दि.३०( punetoday9news):- महाराष्‍ट्र राज्‍य पाठ्यपुस्‍तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाचे ( बालभारती ) सेनापती बापट रोड पुणे येथील कार्यालयाच्या परिसरात असणारे सुसज्‍ज ग्रंथालय वाचकांसाठी खुले करण्यात आले आहे.

या ग्रंथालयामध्‍ये मराठी, इंग्रजी, हिंदी, गुजराती, कन्‍नड, सिंधी, तेलुगु आणि उर्दू या भाषांमध्‍ये विविध संदर्भ ग्रंथ, ललित साहित्‍य, शब्‍दकोश, ज्ञानकोश, भूवर्णन कोश,नकाशे आदी १ लाख ५५ हजार ग्रंथ व पाठ्यपुस्‍तके यांचा विपुल संग्रह करण्‍यात आलेला आहे. तसेच ग्रंथालयात राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय नियतकालिके, इतर राज्‍यातील पाठ्यपुस्‍तके, शिक्षण व ललित साहित्‍य विषय नियतकालिके व त्‍यांचे खंड, तसेच अनेक दुर्मिळ पुस्तके संग्रहित आहेत.

ग्रंथालयाचा उद्देश प्रामुख्‍याने पाठ्यपुस्‍तक मंडळात तयार होणाऱ्या पाठ्यक्रमांसाठी, संशोधनास आवश्‍यक संदर्भ साहित्‍य उपलब्‍ध करून देण्यासाठी तसेच शिक्षक व पाठ्यपुस्‍तकप्रेमी यांना मर्यादित स्‍वरूपात अभ्यासाकरिता होत असे. या ग्रंथालयातील विपुल ग्रंथ संपदेचा लाभ सामान्य वाचकांना तसेच विद्यार्थ्यांना व्हावा याकरिता बालभारती ग्रंथालयाची वाचन सुविधा सशुल्‍क पद्धतीने सर्वांना खुली करण्‍यात येत आहे.

बालभारती ग्रंथालयाची वाचन सुविधा वाचक, अभ्यासक, संशोधक तसेच विद्यार्थांना सकाळी १०.३० ते दुपारी १.३० व दुपारी २.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत साप्‍ताहिक व सार्वजनिक सुट्टया वगळता सशुल्‍क देण्‍याबाबत निर्णय ‘बालभारती’कडून घेण्‍यात आलेला आहे. यासाठी प्रतिदिन २० रुपये शुल्‍क आकारले जाणार आहे. वाचकांनी या सुविधेचा लाभ घ्‍यावा असे आवाहन बालभारतीचे संचालक कृष्णकुमार पाटील यांनी केले आहे.

 

 

Comments are closed

error: Content is protected !!