पुणे दि.१( punetoday9news):- महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाच्या पुणे जिल्हा समन्वय समितीतर्फे राज्य कार्यकारिणी आणि जिल्हा समन्वय समितीवर नव्याने नियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे यांची जिल्हा समन्वय समितीच्या कार्याध्यक्ष पदी निवड करण्यात आली.

मध्यवर्ती इमारत परिसरातील जिल्हा समन्वय समितीच्या कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला राज्य संघटक विनायक लहाडे, नृसिंह मित्रगोत्री, इंजि. विठ्ठल वाघमारे, पशुधन विकास अधिकारी दिपक अवताडे, योगेश शेळके, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या प्रिया शिंदे, प्रादेशिक न्यायवैद्यक कार्यशाळेच्या कोमल काळे आदी उपस्थित होते.

यावेळी राज्य कार्यकरिणीवर निवड झालेल्या उपाध्यक्ष आनंद कटके, राज्य संघटक विनायक लहाडे,मोहन साळवी, विलास हांडे, अशोक मोहिते, विठ्ठल वाघमारे, शिवाजी ठोंम्बरे यांचा सत्कार करण्यात आला. पुणे जिल्हा समन्वय समितीची पुनर्रचना करून नव्याने नियुक्त सदस्यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.

यावेळी बोलताना चंद्रकांत वाघमारे म्हणाले, पुणे जिल्हा समन्वय समितीच्या माध्यमातून अधिकाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. सर्वांना सोबत घेवून संघटनेत काम करुन समान न्याय देण्याचा प्रयत्न करण्यात येईल असेही ते म्हणाले.

लहाडे यांनी मुंबई येथे झालेल्या त्रैवार्षिक अधिवेशनबाबत माहिती दिली. नवीन सहकाऱ्यांच्या समावेशाने अधिकारी महासंघाचे काम अधिक प्रभावी होईल. महासंघाच्यावतीने विधायक मार्गाने अधिकाऱ्यांच्या समस्या शासनापर्यंत पोहोचवून त्याचा सातत्याने पाठपुरावा करण्यात येतो. महासंघाच्या पुणे शाखेने आतापर्यंत राज्यस्तरावर चांगले योगदान दिले आहे, असे त्यांनी सांगितले.

प्रास्ताविकात विठ्ठल वाघमारे यांनी मुंबई येथे झालेल्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीची माहिती दिली. जिल्हा समन्वय समितीच्या नवनियुक्त सदस्यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. यावेळी महासंघाचे पदाधिकारी उपस्थितीत होते.

 

 

 

Comments are closed

error: Content is protected !!