● माजी विद्यार्थी म्हणतात छडीचा मार नव्हे तर संस्काराच्या, शिस्तीच्या तिजोरीची चावी.

● शालेय जीवनाचा प्रवास व आदरणीय शिक्षकांच्या अमुल्य मार्गदर्शनातून आमची यशस्वीतेकडे वाटचाल. 

● सर तुम्ही होतात म्हणून आम्ही घडलो; भावना व्यक्त करताना विद्यार्थ्यांच्या डोळ्यात आठवणी दाटल्या. 

● राष्ट्रगीत गायनाने कार्यक्रमाची सुरूवात ; रांगेत उभे राहून अनुभवला परिपाठ.

जेजुरी, दि.१९( punetoday9news):-  जेजुरीतील पुण्यश्लोक अहिल्यादेवी विद्यामंदिर शाळेत २००१ च्या बॅचचा माजी विद्यार्थी कार्यक्रम संपन्न झाला. तब्बल 21 वर्षानंतर महाराष्ट्र, देश- विदेशातून विद्यार्थी आपल्या शाळेच्या ओढीने कार्यक्रमाच्या निमित्ताने शाळेच्या प्रांगणात जमले व माजी विद्यार्थ्यांची आपुलकीची ‘माझी शाळा’ भरली.

जेजुरीतील पुण्यश्लोक अहिल्यादेवी विद्या मंदिर ही शाळा तत्कालीन ते आजपर्यंत पंचक्रोशीतील सर्वात प्रसिद्ध व आदर्श शाळा म्हणून ओळख आजही टिकवून आहे . शाळेने अनेक क्षेत्रातील अधिकारी, डाॅक्टर, वकील, शिक्षक, नगरसेवक, इंजिनियर व आदर्श नागरिक घडवले आणि त्यात मोलाची भुमिका शिक्षकांनी घडवली. आज त्याच शिक्षकांचा सन्मान करण्यासाठी माजी विद्यार्थी मेळावा आयोजित करण्यात आला.

यावेळी प्राचार्य पोपटराव ताकवले, प्राचार्या उज्वला उपाध्ये,चासकर सर, गुरव सर, सय्यद सर, टाळकुटे सर, गायकवाड सर,गायकवाड मॅडम, कुंभार सर, कुंभार मॅडम, जाधव मॅडम, खुडे सर, दीक्षीत मॅडम, बोराटे मॅडम, बारवकर सर, बारवकर मॅडम, हेमंत बगणर सर, मुळीक सर,दरेकर सर, खराडे सर,खराडे मॅडम, अनिल रासकर सर,गोरे सर,नेवसे सर,भराडे सर तसेच सेवक वैष्णव, शेख, शिंदे उपस्थित होते .

कार्यक्रमाची सुरुवात जनता शिक्षण संस्थेचे संस्थापक बा.ग. जगताप यांच्या स्मृती स्थळाच्या पूजनाने करण्यात आली.  त्यानंतर दिवंगत विद्यार्थ्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. उपस्थित शिक्षकांचे स्वागत माजी विद्यार्थींनी करत आपल्या गुरुजनांच पुस्तक, मानपत्र रूपी भेट देवून सन्मान केला. तसेच शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी क्रीडा साहित्य देण्यात आले.

माजी विद्यार्थ्यांनी भावना व्यक्त करताना सांगितले की वीस वर्षानंतर सोशल मिडीयाच्या जमान्यातही सर्व विद्यार्थ्यांचे संपर्क जुळवताना तारेवरची कसरत करावी लागली. मात्र सोशल मीडियाचा अतिशय वापर करून सर्वांना एकत्र आणण्यासाठी झाल्याचेही नमूद केले.

 

अहिल्यादेवी विद्यामंदिर जेजुरीचे प्राचार्य पोपटराव ताकवले यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, आपल्या शाळेनी दिलेली शिकवण व आपली अभ्यासाची साथ यामुळे आज तुम्ही विभिन्न क्षेत्रात आपला नावलौकिक प्राप्त करत आहात. असेच उंच भरारी घेवून आई- वडिलांचे व आपल्या शाळेची कीर्ती दूरपर्यत पसरवा.

तर स्वामी विवेकानंद विद्यामंदिर दापोडीच्या प्राचार्या उज्वला उपाध्ये- कुलकर्णी म्हणाल्या आज आधुनिक युगातही मराठी शाळेचे विद्यार्थी यशाची उंच शिखरे गाठताना दिसतात. त्यामुळे आज मराठी भाषेविषयी अभिमान हा बाळगायलाच हवा. मराठी भाषेच्या विकासासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करून मराठी भाषेचाच व्यवहारात उपयोग करण्याचे आवाहन केले.

तसेच चासकर सर यांनी आपल्या क्षेत्रात अग्रेसर होण्यासाठी जिद्द, चिकाटी याविषयी उपस्थित माजी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

मोबाईलच्या माध्यमातून संपर्क साधत माजी विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा शाळा भरवली.  आम्ही पुन्हा एकदा विद्यार्थी होऊन विद्यार्थीदशेतील सुख अनुभवण्यासाठी आलो आहोत अशी भूमिका मांडली.  लहानपणी शाळा सुटली पाटी फुटली आनंदाने म्हणणारे विद्यार्थी आज मात्र माझी शाळाच बरी होती अशी भावना व्यक्त करताना दिसले.

 




Comments are closed

error: Content is protected !!