पिंपरी, दि. २३( punetoday9news):- पिंपरी-चिंचवड शहरातील थरमॅक्स लिमिटेड कंपनीमधील कर्मचारी दिपक पाटील यांनी स्केल्स अँड टेल्स वाईल्डलाईफ ऍनिमल रेसक्यू फाउंडेशन,पुणे संस्थेतील सदस्य विशाल पाचुंदे यांना संपर्क करून गव्हाणी(बदामी) घुबडाची 3 पिल्ले आढळल्याची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच संस्थेतील सदस्य लगेच घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी पिल्लांना ताब्यात घेतले. पिल्ले दुसऱ्या मजल्यावरून खाली पडली असल्यामुळे पिलांना पुढील उपचारांसाठी व देखरेखेसाठी पुण्यातील रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्ट येथे पाठवण्यात आले असून उपचारानंतर पिलांना निसर्गात सोडण्यात येणार आहे .
गव्हाणी घुबड हा मानवी वस्तीजवळ जुन्या पडक्या घरामध्ये, झाडांच्या ढोलीमध्ये वास्तव्य करतो. अलीकडील काळामध्ये शहरीकरणामुळे वाढलेल्या सिमेंटच्या जंगलामध्येसुद्धा या घुबडाने आपले अस्तित्व कायम ठेवले व वापरात नसलेल्या इमारतीच्या खिडक्यांमध्ये आपले बस्तान बनवले. यांचे मुख्य अन्न हे उंदीर असून क्वचित साप, पाली व खारीवरसुद्धा उदरनिर्वाह करतात.
अलीकडच्या काळामध्ये जादूटोणा व तत्सम कारणांसाठी घुबडांची खूप मोठ्या प्रमाणावर तस्करी होते. भारतामध्ये अनेक ठिकाणी घुबडे पकडून त्यांची अवैध विक्री केली जाते. भारतातील सर्वच पक्षी हे वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ नुसार संरक्षित आहेत व त्यांना पकडणे, मारणे, विकणे हे बेकायदेशीर आहे. अनेक अवैध व्यापाऱ्यांना कडक शिक्षा झाली आहे. त्यामुळे लक्ष्मीचे वाहन असलेल्या व निसर्गातील महत्त्वाचा घटक असलेल्या घुबडांचे संरक्षण करणे, हे आपले कर्तव्य समजून जादूटोणा किंवा त्यांना पाळण्याचा नादात न पडता एक सुजाण नागरिक म्हणून निसर्गाच्या संवर्धनास मदत केली पाहिजे.
टीम स्केल्स अँड टेल्स ने आजपर्यंत अशा अनेक वन्यजीवांना वाचवून, त्यांच्यावर उपचार करून पुन्हा निसर्गात मुक्त केले आहे. आणि पुढे पण करत राहील तर सर्व नागरिकांना विनंती आहे की तुमच्या घराच्यात जवळपास किंवा मानवी वस्तीत एखादा वन्यप्राणी, पक्षी, सर्प आढळल्यास त्याला त्रास न देता तसेच त्याला स्वतः पकडण्याचा प्रयत्न न करता लगेच 1926 ह्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करून वनविभागाला घटनेची माहिती द्यावी किंवा 7276882656 ह्या क्रमांकावर संपर्क करून तुम्ही आम्हाला घटनेची माहिती देऊ शकता.
Comments are closed