पानशेत, कादवा घाट, अंत्रोली, गुंजवणी सफर .

पिंपरी, दि.२५ ( punetoday9news):-  हिरवीगार झाडी,पानशेत,गुंजवणी धरणाचे बॅकवॉटर न्याहळत,पशु पक्ष्यांचा किलबिलाट तसेच पक्षी निरीक्षण करावयाचे असेल तर पानशेत, कादवा घाट, विहीर, अंत्रोली, गुंजवणी धरणाच्या कडेने निवी, घिसार असा फेरफटका मारायलाच हवा. पुण्यापासुन ७० कि.मी. वर असणार्‍या या निसर्गसंपन्न ठिकाणाची वनडे ट्रिप होऊ शकते.

सिंहगड पायथ्याच्या पुढे पानशेत धरणाच्या जलाशयाच्या कडेकडेने धरणाचा जलाशय न्याहळत आपण निसर्गसंपन्न कादवा घाटाकडे कधी पोहचतो ते समजत देखील नाही .कादवा घाट चढताना सुरूवातीलाच उजवीकडे शिरकोली गावात शिरकोली देवीचे ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेले मंदीर आहे.कादवा घाटातील रस्त्याच्या आजुबाजुला घनदाट झाडी आहे. याठिकाणी आपणास अनेक अपरिचित पक्षी, वेगवेगळी फुले पहावयास मिळतात.आमच्या बरोबर औंध पुणे येथील पक्ष्यांविषयी माहितगार सिद्धार्थ जाधव हे होते त्यामुळे पक्ष्यांविषयी आम्हांला खुप माहिती मिळाली.

राज्य पक्षी हरियाल च्या थव्याचेही ही आम्हांस दर्शन झाले. घाटाच्या माथ्यावर काही वेळ थांबुन शांततेत घनदाट जंगलाबरोबरच पशु पक्ष्यांचे आवाज कानी पडतात त्यामुळे मन हरखुन जाते. घाटाच्याखाली विहीरगावातील शहिद जवानाच्या पुतळ्यास अभिवादन करून आपण अंत्रोली गावाच्यापुढे गुंजवणी धरणाच्या जलाशयाच्या कडेकडेने लहान मोठे धबधबे, ओढे पार करत निवी, घिसर गावाच्यापुढे शेवटचे गाव आहे तेथुन पुढे रस्ता नाही. अतिशय निसर्ग संपन्न परंतु अपरिचित असे हे ठिकाण आहे.

गुंजवणीचे शांत, स्वच्छ पाणी न्याहळत असतानाच आभाळ निरभ्र असेल तर जलाशयाच्या पलिकडच्या बाजुस असणारा राजगड व तोरणा आपल्याला साद घालतो. परतीचा प्रवास जर आपण सायंकाळी सहा नंतर केला तर आपणास जवळुन मोर, लांडोर, रानकोंबडे, लाहोरीचे दर्शन घडते. अशा या स्वर्गाहुन सुंदर ठिकाणाची भेट मनाला भावते.

अशोक जमाले
३१४ नेताजीनगर,पिंपळेगुरव,पुणे ६१
मो.नंबर ८८३०५२५५९१

 




 

 

 

Comments are closed

error: Content is protected !!