पुणे ( punetoday9news):- शिक्रापूर येथील आखाड पार्टी करणाऱ्या ११  डॉक्टरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तळेगाव ढमढेरे येथे ही पार्टी सुरु होती. लॉकडाऊन काळात पाच पेक्षा जास्त नागरिकांना एकत्र येण्यास बंदी असताना या डॉक्टरांनी नियमांचे उल्लंघन करत एकत्र येऊन आखाड पार्टी केली. याशिवाय पोलिसांनी दोन हॉटेल मालकांवर देखील गुन्हे दाखल केले आहेत.  शिरुर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे येथील भीमाशेत वस्तीजवळ एका हॉटेलमध्ये पाच पेक्षा अधिक डॉक्टरांनी एकत्र येऊन शासकीय नियमांचे उल्लंघन करून ओली पार्टी करत असल्याची माहिती शिक्रापूर पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक राजेश माळी, पोलीस शिपाई विकास मोरे यांच्या पथकाने या ठिकाणी छापा टाकला असता सर्व डॉक्टर पळून जाऊ लागले. त्यानंतर पोलिसांनी पाहणी केली असता शिक्रापूर, सणसवाडी परिसरातील तब्बल ११ डॉक्टरांनी एकत्र येत पार्टी केल्याचे आढळून आले.

याबाबत शिक्रापूर पोलिस स्टेशनचे पोलिस शिपाई विकास मोरे (रा. शिक्रापूर, ता. शिरूर जि. पुणे) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशनमध्ये  फिर्याद दिली आहे. त्यानुसार शिक्रापूर पोलिसांनी शिक्रापूर सणसवाडी परिसरातील तब्बल अकरा डॉक्टरांसह दोन हॉटेलच्या मालकांवर गुन्हे दाखल केले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास शिक्रापूरचे पोलिस निरीक्षक सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक राजेश माळी करत आहे.

Comments are closed

error: Content is protected !!