मुंबई, दि. 3 ( punetoday9news):- भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभेच्या 166-अंधेरी पूर्व या मतदारसंघाच्या एक जागेसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यामुळे 3 ऑक्टोबर 2022 पासून अंधेरी (पूर्व) या विधानसभा क्षेत्रात आचारसंहिता लागू झाली आहे. या निवडणुकीकरिता मतदान गुरूवार, दिनांक 3 नोव्हेंबर 2022 रोजी होणार आहे.
निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध करण्याचा दिनांक – 7 ऑक्टोबर 2022 (शुक्रवार), नामनिर्देशन पत्रे सादर करण्याचा अखेरचा दिनांक – 15 ऑक्टोबर 2022 (शनिवार), नामनिर्देशन पत्रांची छाननी – 15 ऑक्टोबर 2022 (शनिवार), उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिनांक 17 ऑक्टोबर 2022 (सोमवार), मतदानाचा दिनांक – 3 नोव्हेंबर 2022 (गुरुवार), मतमोजणीचा दिनांक – 6 नोव्हेंबर 2022 (रविवार) आणि निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचा दिनांक – 8 नोव्हेंबर 2022 (मंगळवार) आहे.
या पोटनिवडणुकीसाठी दि. 1 जानेवारी 2022 रोजी प्रसिद्ध झालेली मतदार यादी वापरण्यात येणार आहे. या पोटनिवडणुकीत मतदानासाठी इव्हीएम आणि व्हीव्हीपॅटचा वापर केला जाणार आहे. मतदारांची ओळख पटावी यासाठी भारत निवडणूक आयोगाचे मतदार कार्ड वापरता येईल. तथापि, ज्या मतदारांकडे मतदार कार्ड नसेल त्यास आयोगाने निश्चित केलेल्या 9 ओळखपत्रांपैकी एक ओळखपत्र मतदानावेळी जवळ बाळगणे आवश्यक आहे.
या पोटनिवडणुकीकरिता उमेदवारी अर्ज भरताना गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांना त्यासंदर्भातील माहिती वृत्तपत्रे आणि दूरचित्रवाणी वाहिन्यांवर देणे बंधनकारक आहे. त्याचबरोबर उमेदवार ज्या पक्षाकडून प्राधिकृत आहे, त्या पक्षालाही संबंधित उमेदवाराची निवड का केली याबाबतची माहिती वृत्तपत्रे, दूरचित्रवाणी आणि पक्षाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करणे आवश्यक असल्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी सांगितले आहे.
Comments are closed