नाशिक ( punetoday9news):- मंगळवार २१ जून रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटना मा. राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात दूध बंद आंदोलन राज्यभर केले जाणार आहे. आज पाण्याच्या बाटली पेक्षा दुधाचा भाव कमी आहे. यामुळे दुधाला तात्काळ ५ रुपये अनुदान मिळावे या प्रमुख मागणीसाठी हे आंदोलन होत आहे. तरी राज्यभरातील दूध उत्पादक शेतकऱ्यांनी एक दिवस दूध बंद ठेऊन आपला आवाज बुलंदपणे शासना पर्यंत पोहचवावा असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांनी केले आहे.
संघटने तर्फे प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात केंद्र शासनाने २३ जूनचा १० हजार टन दूध पावडर आयात करण्याचा निर्णय त्वरीत रद्द करावा. ३० हजार टन दूध पावडरचा बफर स्टॉक करावा, तसेच निर्यात अनुदान प्रति किलो ३० रूपये देण्यात यावे. दूध पावडर, तूप, बटर व इतर दुग्धजन्य पदार्थावरील जीएसटी पूर्णपणे रद्द करण्यात यावा. पुढील तीन महिन्यासाठी राज्य सरकारने थेट शेतकर्यांच्या खात्यावर प्रतिलिटर ५ रूपये अनुदान जमा करावे. या प्रमुख मागण्या केंद्र व राज्य शासना कडे करण्यात आल्या आहे.
हे आंदोलन १ दिवसाचे असून सकाळी ग्रामदेवतेला दूध अभिषेक करून शासनाला सुबुद्धी देण्याची प्रार्थना गावागावात केली जाणार आहे.तसेच त्या दिवसाचे दूध गोरगरिबांना, गरजूंना मोफत वाटले जाणार आहे. महाराष्ट्रातील अनेक मोठया दूध संघांनी या आंदोलनाला पाठींबा दिला आहे.
प्रतिक्रिया-
लोकडाऊन मुळे आज अनेक दूध संघ शेतकऱ्यांना दुधाला १८ ते २० रुपये भाव देत आहेत. त्यात उत्पादन खर्च सुद्धा निघत नाही.त्यामुळे राज्यभरातील दूध उत्पादक त्रस्त आहे. दुधाची विक्री कमी झाली म्हणून दूध उत्पादकांना शासनाने आधार देण्याची गरज आहे. या साठी हे आंदोलन होत आहे . शासनाने लक्ष न दिल्यास लाॅकडाऊनचे नियम तोडून पूर्वी प्रमाणे आक्रमक पणे स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरेल.
– संदीप जगताप
प्रदेशाध्यक्ष – स्वाभिमानी शेतकरी संघटना
Comments are closed