शासकीय कर्मचाऱ्याने तसेच त्यांच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तींनी भेट वस्तू स्वीकारू नये.
पिंपरी, दि. १४( punetoday9news):- दिवाळीच्या पार्श्वभूमीवर, पिंपरी पालिकेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कोणत्याही प्रकारच्या भेटवस्तू अथवा देणगी स्वीकारू नयेत, अशी लेखी सूचना प्रशासक तथा आयुक्त शेखर सिंह यांनी दिली आहे. या आदेशाचे पालन न करणाऱ्यांच्या विरोधात शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल असे सांगण्यात आले आहे.
अनेकदा पालिका कर्मचारी काम टाळत नागरिकांकडे दिवाळी भेट अथवा पैशाची मागणी करतात त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागतो.
गुरुवारी सायंकाळी आयुक्तांनी याबाबत स्वतंत्र परिपत्रक काढले. पालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीसह क्षेत्रीय कार्यालये, विभागीय कार्यालयांमध्ये तथा कार्यालयांच्या आवारातही देणगी किंवा भेटवस्तू आत आणण्यास व स्वीकारण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. अशाप्रकारच्या व्यक्ती आढळून आल्यास सुरक्षा विभागाने संबंधितांना मज्जाव करावा, असे आयुक्तांनी या आदेशात स्पष्ट केले आहे. शासकीय कर्मचाऱ्याने तसेच त्यांच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तींनी भेट वस्तू स्वीकारू नये, असेही परिपत्रकात नमूद केले आहे
Comments are closed