पुणे, दि. १५( punetoday9news):- पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे विधी महाविद्यालय हडपसर पुणे येथे डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस ‘वाचन प्रेरणा दिन’ म्हणून साजरा करण्यात आला.
या दिवसाचे औचित्य साधून महाविद्यालयात प्राचार्य डॉ.रंजना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम घेण्यात आले.यात ‘पुस्तक प्रदर्शन’ व ‘बुक रेव्ह्यू’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. प्रथमता महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. रंजना पाटील यांच्या हस्ते डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पुढील कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
‘बुक रिव्ह्यू’ या स्पर्धेत एकूण तेरा विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. याप्रसंगी प्राचार्य डॉ. रंजना पाटील यांनी वाचनाचे महत्त्व आपल्या आयुष्यामध्ये किती महत्त्वाचे आहे याबद्दल सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तसेच “todays reader become leader” या उक्तीप्रमाणे आपण वाचनाला फार महत्त्व दिले पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले. तसेच विधी महाविद्यालयात ग्रंथालय विभागांतर्गत ‘पुस्तक प्रदर्शन’ करण्यात आले.यात साहित्य,कला,क्रीडा,संस्कृती,विधी,विधीशास्त्र, विज्ञान,तंत्रज्ञान इत्यादी पुस्तकांचे प्रदर्शन करण्यात आले या प्रदर्शनास महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला. या कार्यक्रमाचे नियोजन व आयोजन सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.सनोबर काझी यांनी केले.
बुक रिव्ह्यू या स्पर्धेचे परीक्षक म्हणून प्रा. शिवाजी बिबे प्रा. सीमा वावरे प्रा. मयूर कोळेकर यांनी काम पाहिले. या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व स्पर्धकांचे,विद्यार्थ्यांचे आणि शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे आभार प्रा.संतोष सुतार यांनी केले.
Comments are closed