ग्लोबल स्टार फाउंडेशन तर्फे ‘डॉ. सलील कुलकर्णी संगीत साधना पुरस्कार’ प्रदान
पुणे, दि.१७ ( punetoday9news):- माझी पुणे महापालिकेने स्वच्छ पुणे ब्रँड ऍम्बेसिडर म्हणून नियुक्ती केली आहे, हा माझा सन्मान असून, स्वच्छतेमध्ये पुणे शहराला प्रथम क्रमांक मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असणार आहे, असे प्रतिपादन संगीतकार, गायक, दिग्दर्शक डॉ. सलील कुलकर्णी यांनी केले.
ग्लोबल स्टार फाउंडेशनच्या वतीने डॉ. सलील कुलकर्णी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ‘डॉ. सलील कुलकर्णी संगीत साधना पुरस्कार, आदर्श शाळा, आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी डॉ. सलील कुलकर्णी बोलत होते. अण्णा भाऊ साठे सभागृह बिबवेवाडी येथे झालेल्या कार्यक्रमात यंदाचा डॉ. सलील कुलकर्णी संगीत साधना पुरस्कार युवा तबला वादक ओंकार इंगवले यांना प्रदान करण्यात आला. आदर्श शाळा पुरस्कार विश्वकर्मा विद्यालय व सेंट जोसेफ कॉनव्हेनट स्कुल वाघोली यांना, तर आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार संजय मारोतराव मारणे जिल्हा परिषद शाळा, लवळे यांना प्रदान करण्यात आला. यावेळी भजन सम्राट रघुनाथ खंडाळकर, उद्योजक तुषार केळकर, संजय देशपांडे, प्रज्ञा देशपांडे. कल्पना गोसावी, संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा सारिका शेंडे, महानंतेश नाईक, वृषाली कुलकर्णी, दिक्षा पेठे, प्रियांका शेंडे, मनोज पंडित, संजय यादव, अविनाश रसाळ, नीलिमा रसाळ, डॉ. मिताली मोरे, संस्थेचे पदाधिकारी आदी उपस्थित होते.
डॉ. सलील कुलकर्णी म्हणाले, की संगीत क्षेत्रात नावलौकिक कमवू पाहणाऱ्या तरुण संगीतकार, गायकांना पुरस्कार देऊन प्रोत्साहित केले जात आहे, ही अभिमानास्पद गोष्ट आहे. ग्लोबल स्टार फाउंडेशन करीत असलेले काम खूप चांगले आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सारिका शेंडे यांनी, सूत्रसंचालन आकाश कंकाळ यांनी केले.
Comments are closed