यशस्वी एकेडमी फॉर स्किल्स व पिंपरी चिंचवड माध्यमिक विद्यालय,थेरगावचा संयुक्त उपक्रम
पिंपरी, दि. १९( punetoday9news):- यशस्वी एकेडमी फॉर स्किल्स संस्थेमार्फत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पिंपरी चिंचवड माध्यमिक विद्यालय, थेरगांव येथे सरकारच्या समग्र शिक्षा अभियानाअंतर्गत ऑटोमोटिव्ह सर्व्हिस टेक्निशियन या विषयाचे कौशल्य विकास प्रशिक्षण शिकविण्यात येते.
या महाविद्यालयातील इयत्ता नववी व दहावीच्या ऑटोमोटिव्ह सर्व्हिस टेक्निशियन ट्रेडच्या विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक मोबिलिटी उद्देशाअंतर्गत इनोव्हेशन संकल्पनेअंतर्गत महाविद्यालयाचे प्राचार्य चंद्रशेखर कदम व ‘यशस्वी’ संस्थेचे प्रशिक्षक संतोष शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सौर उर्जेवर चालणाऱ्या भारतीय बनावटीच्या दोन इलेक्ट्रिकल दुचाकी अर्थात ई – बाईकची निर्मिती केली आहे.
शालेय विद्यार्थ्यांनी ऑटोमोटिव्ह सर्व्हिस टेक्निशियनच्या कौशल्य विकास प्रशिक्षणातून प्रेरणा घेऊन ई बाईक तयार करण्याचा विचार केला. दुचाकीच्या विविध सुट्या भागांची स्क्रॅपमधून जुळवाजुळव केली व प्रशिक्षक संतोष शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली ई बाईक तयार करण्याचा प्रयत्न यशस्वी केला.
हा प्रयोग यशस्वी झाल्यामुळे विद्यार्थ्यांमधील आत्मविश्वास वाढीस लागला आहे. महाविद्यालयातील हनुमंत सुनील सुरवसे, प्रज्ञेश सोपान गायकवाड, मयुरी अशोक वाघमारे, राधिका अनिल पुजारी या विद्यार्थ्यांनी या प्रकल्पात सहभाग घेतला. विद्यार्थ्यांचा हा प्रयोग यशस्वी झाल्याबद्दल ‘यशस्वी एकेडमी फॉर स्किल्सचे संचालक राजेश नागरे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना विशेष सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
समग्र शिक्षा अभियानातील विविध प्रकारच्या कौशल्य विकास प्रशिक्षणामुळे शालेय स्तरापासूनच विद्यार्थ्यांमध्ये संशोधनवृत्ती, इनोव्हेशन या गोष्टी वाढू लागल्यामुळे भविष्यातील आत्मनिर्भर युवा पिढी घडविण्यासाठी याचा मोठा लाभ होत आहे असे मत यावेळी ‘यशस्वी’ संस्थेचे संचालक राजेश नागरे यांनी व्यक्त केले.
तर, अगदी इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनासुद्धा सहज शक्य नसलेली कामगिरी ही महानगरपालिकेच्या सरकारी शाळांमधील विद्यार्थी ‘यशस्वी’ संस्थेमार्फत राबविण्यात येणाऱ्या समग्र शिक्षा अभियान या उपक्रमामुळे करू शकत आहेत ही विशेष उल्लेखनीय बाब म्हणावी लागेल असे मत पिंपरी चिंचवड माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य चंद्रशेखर कदम यांनी व्यक्त केले.
Comments are closed