पुणे, दि. २१ ( punetoday9news) :- दीपावली उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड शहर पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ नुसार पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात २४ ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून ते २३ नोव्हेंबर २०२२ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत ध्वनी प्रदूषण करणारे फटाके उडविण्यास रात्री १० वाजल्यापासून सकाळी ६ वाजेपर्यंत संपूर्ण मनाई केली आहे.
या कालावधीत १०० पेक्षा जास्त फटाके असलेल्या आणि १२५ डेसीबल पेक्षा जास्त आवाज निर्माण करणारे सर्व साखळी फटाके उडविण्यासदेखील मनाई करण्यात आली आहे. कोणत्याही रस्त्यावर किंवा रस्त्यापासून ५० फुटाच्या आत कोणतेही फटाके स्वैरपणे उडविणे किंवा दारु काम सोडणे किंवा फेकणे अगर आगी फुगे (फायर बलून) किंवा अग्नीबाण सोडणे, उडविणे असे कृत्य करणे, एखादा फटाका उडविण्याच्या जागेपासून ४ मीटर अंतरावर १२५ डेसीबल आवाज निर्माण करणाऱ्या फटाक्याचे उत्पादन विक्री व वापरण्यास मनाई करण्यात येत आहे.
साखळी फटाका ५० ते १०० तसेच १०० व त्यावरील फटाके असतील तर आवाजाची मर्यादा फटाका उडविण्याच्या जागेपासून ४ मीटर अंतरापर्यंत अनुक्रमे ११०, ११५ व १२५ डेसीबलपेक्षा जास्त असता कामा नये.
या आदेशाचे उल्लंघन करणारे व्यक्ती महाराष्ट्र पोलीस अधिनियमाच्या कलम १३१ प्रमाणे कायदेशीर शिक्षेस पात्र राहील, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.
Comments are closed