● पुणे महानगरपालिकेच्या वारजे कर्वेनगर क्षेत्रिय कार्यालयांतर्गत “माती विरहीत टेरेस गार्डन” उपक्रम.
पुणे, दि.२६( punetoday9news):- आजादी का अमृत महोत्सव व स्वच्छ सर्वेक्षण 2023 अंतर्गत स्वच्छ प्रभाग मानांकन या बाबींच्या अनुषंगाने वारजे कर्वेनगर क्षेत्रिय कार्यालयाच्या इमारती च्या टेरेसवर महापालिका सहायक आयुक्त राजेश गुर्रम यांच्या मार्गदर्शनाखाली व ब्रँड अँबेसिडर रुपाली मगर यांच्या विशेष प्रयत्नातून “माती विरहित टेरेस गार्डन तयार करण्यांत आले. त्याचे उद्घाटन शुक्रवार (दि.२१) रोजी आशा राऊत व डॉ. सलील कुलकर्णी यांचे उपस्थितीत करण्यात आले.
यावेळी अशोक घोरपडे, मुख्य उद्यान अधीक्षक, डॉ. केतकी घाडगे, सहायक आरोग्य अधिकारी सर्व माजी नगरसेवक व मोहल्ला कमिटी सदस्य उपस्थित होते.
सदर उपक्रमात सहवर्धन संस्थेचे स्वयंसेवक, मोहल्ला कमिटी मेम्बर्स, ग्रीन हिल्स संस्था व सुनील भिडे व अर्चना गोगटे यांनी मोलाचे योगदान दिले. यासाठी टाकाऊतून टिकाऊ उपक्रमा अंतर्गत अतिक्रमण कारवाईत जप्त केलेले प्लास्टिकचे मोठे क्रेट आणून त्यामध्ये रोपे लावण्यात आले असून त्यावर आजूबाजूच्या घरांतील ओला कचरा आणून त्यात जिरवला जातो.
हा उपक्रम अत्यंत स्तुत्य असून पुणे महानगरपालिकेच्या इतर सर्व क्षेत्रिय कार्यालयांतर्गत देखील याचप्रमाणे टेरेस गार्डनिंग उपक्रम राबविण्यात येईल असे यावेळी श्रीमती आशा राऊत, उप आयुक्त, घनकचरा व्यवस्थापन यांनी सांगितले.
??? वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालय गच्चीवरील मातीविरहित बागेबद्दल उपयुक्त माहिती. ?☘?
१. भाजीचे क्रेट/ कुंडी / इम घ्यावेत. त्याला पाणी वाहून जाण्यासाठी तळाला पुरेसे भोक असल्याची खात्री करून घ्यावी.
२. क्रेट असल्यास त्याला पूर्ण जाळीच असते त्यामुळे त्यात भोक पाडलेला बॅनर जाड प्लास्टिक घालावं.
३. त्यावर नारळाच्या शेंड्यांचा एक थर. त्याच्यावर बारीक तुकडे केलेला पालापाचोळा एक थर, त्यावर भूमी कंपोस्ट खत आणि कोकोपीट एकत्र करून त्याचा एक थर द्यावा.
४. आपल्याला हवे ते झाड मधोमध खोलगट भाग करून त्यात लावावं. झाडाच्या मुळाबरोबर असेल तेवढीच माती असू द्यावी त्याशिवाय जास्तीची माती घालण्याची गरज नाही.
५. झाडाला पुरेसं ऊन, पाणी मिळेल याची काळजी घ्यावी.
६. दर चार ते पाच दिवसांनी थोडा थोडा भाजीचा कचरा, फळांच्या साली घालाव्या. सुरवातीला हा कचरा थोडा बारीक करून घालावा. त्यावर कंपोस्टचा हलका थर द्यावा (कचरा वर दिसू नये असं वाटत असेल तर अन्यथा गरज नाही)
७. तीन ते चार आठवड्यातून एकदा जीवामृत द्यावे
८. रोग नियंत्रणासाठी पाणी मिसळून गोमूत्र / निमपेंड/ नीम ऑईल + साबण पाणी. अशा गोष्टींचा वापर करावा आणि केमिकल विरहित, नैसर्गिक फळं, भाज्या, फुलांचा आस्वाद घेऊन निसर्ग संवर्धनातला आपला वाटा उचलावा!
Comments are closed