पिंपरी : कर्तव्य आणि कर्म करीत राहणे ही खरी परमेश्वरभक्ती होय. अशी प्रवृत्ती मार्गी शिकवण देणारे संत श्री सावता महाराज यांचे विचार प्रत्येकाने अंगिकरणे आवश्यक आहे असे मत हभप महादेव महाराज भुजबळ यांनी आपल्या प्रवचनातून व्यक्त केले.महात्मा जोतिबा फुले मंडळ आणि माळी महासंघ पश्चिम महाराष्ट्र यांच्या वतीने श्री संत शिरोमणी सावता माळी यांच्या ७२५ व्या संजीवन समाधी सोहळा साधेपणाने चिंतामणी चौक वाल्हेकर वाडी येथे फेसबुक च्या माध्यमातून साजरा करण्यात आला.
यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व धार्मिक व सामाजिक कार्यक्रमावर बंधने घालण्यात आली आहेत.संत शिरोमणी सावता माळी यांच्या संजीवन समाधी सोहळा कार्यक्रम मंडळाच्या वतीने दरवर्षी मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो. मात्र यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केवळ पाच पदाधिकाऱ्यांनी एकत्रित येत पुण्यतिथी साजरी केली. यावेळी माळी महासंघ पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अतुल क्षीरसागर, मंडळाचे अध्यक्ष हणमंत माळी, सचिव विश्वास राऊत, वैजीनाथ माळी, किशोर माळी, बापूसाहेब गोरे आदी उपस्थित होते.
उदार आणि सर्वसमावेशक तत्त्वावर वारकरी संप्रदायाची उभारणी झाली. या संप्रदायातील सर्व संत अध्यात्मनिष्ठच होते. त्यांचे कार्य तर नि:संशय धार्मिक स्वरूपाचे होते तरी देखील त्यांच्या तत्त्वनिरूपणात आणि भक्तीपर वाङ्मयात सामाजिक आशय ओतप्रोत भरून राहिला आहे. किंबहुना या सामाजिक आशयाच्या आगळेपणामुळेच वारकरी पंथाला इतकी लोकप्रियता लाभली आहे. एकाच जागी स्थिर राहून विठ्ठल भक्तीचा दीप त्यांनी उजळला.
प्रवचनाच्या वेळी हभप भुजबळ महाराज म्हणाले, ” सावता महाराजांचे पावन चरित्र, प्रेरक व्यक्तिमत्त्व आणि प्रभावी कर्तृत्व याची उज्ज्वल यशोगाथा ही तुमची आमची लाख मोलाची ठेव ठरली. अंधश्रद्धा, कर्मठपणा, क्षुद्रदेवता भक्ती, दांभिकता व बाह्य अवडंबर यावर त्यांनी कुणाचीही भीडमुर्वत न ठेवता नि:शंकपणे कोरडे ओढले. संत सावता माळी यांचे विचार अर्थपूर्ण आहेत. पोटापाण्याचा व्यवसाय हा प्रत्येकालाच करावा लागतो. तसे पाहिले तर हे संत उत्तम कारागीर होते. स्वत:चा व्यवसाय सांभाळून त्यांनी परमात्मा उपासना चालू ठेवली होती. अशा थोर पुण्यात्म्याचा शेवटही तितकाच गोड आहे. प्रात:काळी स्नान करुन त्यांनी दैनंदिन यथाविधी के ली. आणि आपला देह अनंतात विलीन केला.”
Comments are closed