छावा मराठा संघटनेचे जिल्हाप्रमुख रामभाऊ जाधव यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

पिंपरी,दि. ९( punetoday9news):-
राज्यातील अनेक सुशिक्षित बेरोजगार विद्यार्थी दिवस-रात्र अभ्यास करुन नोकरीसाठी परीक्षेला समोरे जातात. मात्र, ऑनलाईन भरती प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करुन काही मोजक्याच विद्यार्थ्यांना नोकरीवर लावले जात असल्याचे वास्तव आहे. त्यामुळे परीक्षांसाठी ऑनलाईन फॉर्म पद्धत बंद करून पारंपरिक पद्धती (एम्प्लॉयमेंट) द्वारे परीक्षा घेण्यात याव्यात, अशी मागणी छावा मराठा संघटनेचे पुणे जिल्हाप्रमुख रामभाऊ जाधव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की विविध स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करीत असलेल्या सुशिक्षित बेरोजगार युवकांवर, विद्यार्थ्यांवर शासनाने ऑनलाईन फॉर्म पद्धत लादलेली आहे. याद्वारे घेण्यात येणाऱ्या प्रत्येक ऑनलाईन परीक्षेमुळे विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाचे व संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. या पद्धतीवर विद्यार्थ्यांचा विश्वास राहिलेला नसून, जे विद्यार्थी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले आहेत त्यांना डावलून इतरांचीच निवड करण्यात आली आहे. लाखो विद्यार्थ्यांनी फॉर्म भरूनही मुलाखतीला बोलावले जात नसल्याची वस्तुस्थिती आहे. सर्व परीक्षांची तपासणी एसआयटीमार्फत व्हावी, अशी मागणीही रामभाऊ जाधव यांनी केली आहे.
आपल्या मागण्यांमध्ये कुठल्याही रिक्त जागेची भरती ही जिल्हा निवड समिती मार्फत घेण्यात यावी. ऑनलाइन फॉर्म द्वारे भरती प्रक्रिया बंद करण्यात यावी. एक परीक्षा एक पेपर घेण्यात यावा. एमपीएससीप्रमाणे लेखी परीक्षा घेऊन उत्तरपत्रिकेची कार्बन कॉपी देण्यात यावी. स्पर्धा परीक्षांची फी ही 100 रुपये ठेवण्यात यावी, अशा विविध मागण्या करण्यात आल्या आहेत.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Comments are closed

error: Content is protected !!