पिंपरी, दि. ९(punetoday9news):- जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा २०२२-२३ च्या अनुषंगाने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने जय्यत तयारी सूर केली असून, स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी महापालिकेची यंत्रणा सज्ज असल्याची माहिती आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी दिली.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि जिल्हा क्रीडा परिषद, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने शासकीय जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. दि. १५ नोव्हेंबर २०२२ ते दि.१७ डिसेंबर २०२२ या कालावधीत महापालिकेचे विविध मैदाने जलतरण तलाव, क्रीडासंकुले यांच्यासह शहरातील विविध शाळांच्या परिसरात या स्पर्धा पार पडणार आहेत. यामध्ये १४, १७, १९ अशा वयोगटातील मुले, मुलींच्या स्पर्धा रंगणार आहेत.
सुमारे ४९ खेळ प्रकारच्या क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये क्रिकेट, टेबल टेनिस, बुद्धिबळ, शालेय फुटबॉल, कराटे, तलवारबाजी, किक बॉक्सिंग, बास्केटबॉल, स्क्वॅश, योगासन, रायफल शुटींग, बॉक्सिंग, थ्रोबॉल, खो खो, हॉलीबॉल, लॉनटेनिस, बॅडमिंटन, रोलर स्केटिंग, जलतरण व डायव्हिंग, वॉटरपोलो, जिम्नॅस्टिक्स, शुटींग बॉल, मल्लखांब, रोप मल्लखांब, टेनीक्वाईट, रोलर हॉकी, हँडबॉल, कॅरम, वेट लिफ्टिंग, नेटबॉल, सिकई मार्शल आर्ट, शालेय हॉकी, सायकलिंग, सॉफ्टबॉल, बॉल बॅडमिंटन, सेपक टकरा, तायक्वांदो, बेसबॉल, रग्बी, काळे मैदानावर सॉफ्ट टेनिस, थ्रोबॉल, टेनिक्वाईट, डॉजबॉल खेळाचे सामने रंगणार आहेत. ज्ञानप्रबोधीनी नवनगर विद्यालय निगडी येथे मल्लखांब, रोप मल्लखांब, शुटींगबॉल, जिम्नॅस्टिक्स, हॉलीबॉल खेळांचे सामने पार पडणार आहेत.
थेरगाव येथील महापालिकेच्या माध्यमिक विद्यालयात रायफल शुटींग स्पर्धा भरणार आहेत. निगडी आणि रावेत येथील सिटीप्राईड स्कुलमध्ये बास्केटबॉलचे सामने होणार आहेत. तसेच संत ज्ञानेश्वर महाराज क्रीडा संकुल, इंद्रायणीनगर येथे बॉक्सिंग, बॅडमिंटन तसेच इतर मैदानी खेळ पार पडणार आहेत. साधू वासवानी स्कुल, मोशी प्राधिकरण येथे स्क्वॅश या खेळाच्या स्पर्धा रंगणार आहेत. निगडी येथील डी आय सी एस इंग्लिश मिडियम स्कुल मध्ये योगासन तसेच अभिषेक विद्यालय, शाहूनगर आणि कै. सदाशिव बहिरवाडे मैदान, शाहूनगर येथे खो खो, आट्यापाट्या खेळांच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे, पै. मारुती कंद स्केटिंग मैदान, भोसरी आणि महापालिका आयुक्त यांच्या मोरवाडी येथील बंगल्यासमोर रोलर स्केटिंग स्पर्धा भरणार आहेत, कै. अण्णासाहेब मगर स्टेडियम जलतरण तलाव, नेहरूनगर येथे जलतरण व डायव्हिंग, वॉटरपोलो, वेट लिफ्टिंग, मॉडर्न पॅटथलॉन या स्पर्धा पार पडणार आहेत. सेंट उर्सुला हायस्कूल, आकुर्डी येथे नेटबॉल, पवना नगर बॅडमिंटन हॉल चिंचवड येथे, सिकई मार्शल आर्ट, सेपक टकरा, ज्युदो या स्पर्धा रंगणार आहेत. तसेच एच ए स्कुल, पिंपरी येथे रग्बी, अमृता विद्यालयम,निगडी येथे बॉल बॅडमिंटन, गोदावरी हिंदी विद्यालय, आकुर्डी, येथे सायकलिंग, कै. तानाजी लांडगे क्रीडा संकुल, कासारवाडी येथे कबड्डी, यमुनानगर स्केटिंग मैदान, निगडी येथे रोल बॉल या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच चिंचवड येथील कै. बाळासाहेब गावडे जलतरण तलावासमोरील महापालिकेच्या मैदानात धनुर्विद्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
शासकीय जिल्हा क्रीडा स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी तसेच खेळाडूंच्या सोयीसाठी महापालिकेच्या वतीने सार्वजनिक स्वच्छता, पिण्याचे पाणी, वैद्यकीय पथक, अँब्युलंस, सुरक्षा पथक यांच्यासह विविध सोयी सुविधा उपलब्ध करुण देण्यात आले असल्याची माहिती प्रभारी क्रीडा अधिकारी अनिता केदारी यांनी दिली.
Comments are closed