पुणे, दि. १२( punetoday9news):- डॉ. श्रीमंत कोकाटे लिखित सौंदर्याचा रंग कोणता हा ग्रंथाचे प्रकाशन प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या हस्ते आज शनिवार (दि. १२) पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी स्वागताध्यक्ष म्हणून राष्ट्रसेवा समुहाचे संस्थापक अध्यक्ष राहुल पोकळे उपस्थित होते. कार्यक्रमास प्रमुख वक्ते म्हणून प्राच्यविद्या अभ्यासक राजकुमार घोगरे, पत्रकार, लेखिका श्रुति गणपत्ये, संत साहित्याचे अभ्यासक प्रा. डॉ. संजय चौधरी, सांस्कृतिक प्रश्नांचे अभ्यास डॉ. संग्राम पाटील ( ऑनलाईन) उपस्थित होते.
तर प्रमुख पाहुणे म्हणून गिरीप्रेमी रविदादा ढमढेरे, जयहिंद शुगरचे गणेश माने देशमुख, इतिहास अकादमी सदस्य लहूआण्णा लांडगे, लोकप्रिय नेते बाबाराजे जाधवराव, डाॅ. दिपक बोधले, उदयोजक गणेश भरेकर उपस्थित होते.
कार्यक्रमांमध्ये बोलताना नागराज मंजुळे यांनी आपल्या बालपणातील काही आठवणी सांगितल्या यामध्ये प्रामुख्याने काळा रंग हा इतरांना चिडवण्यासाठी, राग व्यक्त करण्यासाठी, हिणवण्यासाठी वापरला जातो. त्यामुळे आज वर्णभेद विसरून सर्व समान विचारसरणी अंमलात आणण्याची गरज आहे. आज आपण भारतीय म्हणून जगाच्या पाठीवर खूप विकसित झालो असूनही वर्णभेद मानत असू तर आपल्या विचारसरणीलाही अद्ययावत करण्याची गरज आहे. काळा – गोरा, श्रीमंत – गरीब, उच्च वर्ण – निम्न वर्ग अशा पद्धतीचेही भेदाभेद आज काळाच्या पडद्याआड जाणे गरजेचे आहे.
तर पत्रकार, लेखिका श्रुती गणपत्ये यांनी आहार शास्त्राचे महत्व सांगितले माणूस शाकाहारी की मांसाहारी? हा वाद करण्यापेक्षा प्रत्येकाला आहार स्वातंत्र्य असायला हवे. तसेच प्रत्येक व्यक्ती विभिन्न विचाराच्या असल्याने त्यांच्या विचारांनाही मोकळीक मिळायला हवी. हे चांगले, हे वाईट हे ठरवताना प्रत्येक व्यक्तीचे मतही महत्त्वाचे आहे केवळ इतरांनी ठरवलेल्या विचारानुसारच प्रत्येकाने वागायला हवे असे म्हणणे चुकीचे ठरेल असेही त्या म्हणाल्या.
तर श्रीमंत कोकाटे यांनी पुस्तकाविषयी वर्णन करताना सांगितले हे पुस्तक फक्त माणसाच्या रंगाविषयी माहिती देणारे नसून समाजातील प्रत्येक ठिकाणी होणाऱ्या भेदावर यात भाष्य केले आहे. माणूस आहार- विचार, वर्ण- वर्ग, जात-धर्म अशा अनेक ठिकाणी भेदाभेद पाहतो. तो भेदाभेद नष्ट होणे ही काळाची गरज आहे. प्रत्येक मानवाने शिक्षणातून वैज्ञानिक दृष्टिकोन आत्मसात करायला हवा. जे योग्य व सत्य आहे ते स्वीकारायला हवे.
Comments are closed