पिंपरी, दि. १७( punetoday9new):- महानगरपालिकेच्या वतीने जनसंवाद सभेच्या वेळांमध्ये बदल करण्यात आले असून यापुढे प्रत्येक सोमवार ऐवजी महिन्यातील दुस-या व चौथ्या सोमवारी क्षेत्रीय कार्यालयांमध्ये जनसंवाद सभा होणार आहेत, याबाबतचे आदेश आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी सर्व क्षेत्रीय कार्यालयांना दिले आहेत.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने नागरिक आणि प्रशासन यांच्यामध्ये सुसंवाद राखण्यासाठी, तक्रारींचे निवारण जलदगतीने करण्यासाठी आणि प्रशासकीय निर्णयामध्ये तसेच होणा-या विकासकामांमध्ये नागरिकांच्या आशा आकांक्षांचे प्रतिबिंब उमटावे यासाठी क्षेत्रीय कार्यालय निहाय दर सोमवारी जनसंवाद सभेचे आयोजन करण्यात येत होते. आता वेळांमध्ये बदल करण्यात आला असून महिन्यातील दुस-या व चौथ्या सोमवारी क्षेत्रीय कार्यालयांमध्ये जनसंवाद सभा होणार आहेत.
महापालिका कार्यालयीन कामकाजाचे प्रत्येक आठवड्यामध्ये केवळ पाच दिवस असल्याने तसेच दर आठवड्याला प्रत्येक सोमवारी जनसंवाद सभा असल्याने या सभेमध्ये दाखल झालेल्या नागरिकांच्या तक्रारींचा निपटारा करण्यासाठी पुरेसा अवधी प्राप्त होत नसल्याचे आढळून आले आहे. प्रत्येक जनसंवाद सभेच्या प्रारंभी मागील सभेत आलेल्या तक्रारींवर महापालिकेच्या वतीने केलेल्या कार्यवाहीबाबत आढावा घेण्यात येतो. तक्रारींची वाढती संख्या आणि त्यांचे स्वरूप पाहता तक्रारींचे निवारण करण्यासाठी महापालिकेच्या अधिकारी व कर्मचा-यांना पुरेसा वेळ उपलब्ध होत नसल्याचे यामध्ये निदर्शनास आले आहे. जनसंवाद सभेत आलेल्या तक्रारींचे विहित कमी वेळेत निवारण न झाल्याने पुढील जनसंवाद सभेत तक्रारींचा आढावा घेतला असता अनेक तक्रारी प्रलंबित असल्याचे आढळून येत आहे. तक्रारींची संख्या व स्वरूप लक्षात घेता जनसंवाद सभेतील तक्रारी प्रलंबित राहण्याची संख्या वाढत असून यामागे अधिकारी व कर्मचा-यांना पुरेसा कालावधी न मिळणे हे कारण असल्याचे तक्रारदार नागरिकांनी देखील प्रतिक्रिया बोलुन दाखविल्या आहेत.
जनसंवाद सभेत येणारे नागरिक अनेक तक्रारी घेऊन येतात, जनसंवाद सभेत येणाऱ्या नागरिकांची संख्या सरासरी शंभराच्या आत असली तरीही प्रत्येक्षात तक्रारींची संख्या त्यापेक्षा अधिक आहे. एक नागरिक एकापेक्षा अधिक तक्रारी घेऊन येत असल्यामुळे तक्रारींची संख्या वाढत असून तुलनेत तक्रार निवारणासाठी असलेला कालावधी अपुरा पडतो आहे. तसेच महापालिकेच्या कार्यालयांमध्ये इतर कामकाजाच्या दिवशी देखील तक्रारी येतात त्यांचेही निवारण महापालिका करत असते. या सर्व बाबींचा विचार करून क्षेत्रीय कार्यालयाकडील जनसंवाद सभेमध्ये नागरिकांकडून प्राप्त होणा-या तक्रारी विहीत वेळेत निकाली काढण्यासाठी प्रत्येक सोमवार ऐवजी प्रत्येक महिन्याच्या दुस-या व चौथ्या सोमवारी क्षेत्रीय कार्यालय निहाय सकाळी १० ते १२ या वेळेत जनसंवाद सभेचे आयोजन करण्यात येणार आहे, अशी माहिती आयुक्त शेखर सिंह यांनी दिली.
Comments are closed