पुणे,दि. १८ ( punetoday9news):- महाराष्ट्र वस्तू आणि सेवाकर विभागाने कर चुकविणाऱ्या कंपन्यांच्या विरोधात विशेष तपास मोहिमेंतर्गत रामनारायण वरूमल अग्रवाल या व्यक्तीला ६३० कोटी रुपयांच्या बनावट पावत्यांद्वारे ११० कोटी रुपयाचे बनावट कर क्रेडिट वापरल्याबद्दल आणि पास केल्याबद्दल अटक केली आहे.

महाराष्ट्र वस्तू आणि सेवा कर विभागाने बनावट पावत्यांमध्ये गुंतलेल्या करदात्यांच्या विरोधात केलेल्या विशेष मोहिमेचा एक भाग म्हणून मेसर्स अग्रवाल एंटरप्रायझेस आणि इतर कंपन्यांच्या बाबतीत तपासणी करण्यात आली. रामनारायण बरुमल अग्रवाल (वय ६२ वर्षे) हे २६ बोगस कंपन्या तयार करण्यात सहभागी असल्याचे तपासात निष्पन्न झाले. या कंपन्यांनी ५६. ३४ कोटी रुपयांचे बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट घेतल्याचे आणि ५४. ६४ कोटी रुपयांचे बनावट कर क्रेडिट वस्तू किंवा सेवांचा प्रत्यक्ष पुरवठा न करता पास केल्याचे आढळून आले असून या पद्धतीने वस्तू आणि सेवाकर विभागाची फसवणूक केली.

या प्रकरणात, बनावट करदात्यांकडून खरेदी इनपुट टॅक्स क्रेडिटचा दावा केला गेला आणि त्यामुळे महाराष्ट्र वस्तू आणि सेवा कर कायदा २०१७ च्या तरतुदींचे उल्लंघन केल्याबद्दल अग्रवाल यांना अटक करण्यात आली असून मुख्य न्यायदंडाधिकारी, पुणे यांनी १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

विभागाचे अप्पर राज्यकर आयुक्त धनंजय आखाडे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यकर सहआयुक्त दीपक भंडारे यांच्या नेतृत्वाखाली अटकेची कारवाई करण्यात करण्यात आली आहे.

२०२२-२३ मधील आतापर्यंत ५० वी अटकेची कारवाई केली आहे. यापुढेही महाराष्ट्र वस्तू आणि सेवा कर विभागाने करचोरी करणाऱ्या, बनावट इनव्हॉइस जारी करणाऱ्या आणि बनावट इनपुट टॅक्स क्रेडिटचा दावा आणि पास करणाऱ्यावर कठोर कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती विभागाचे जनसंपर्क अधिकारी भागवत चेचे यांनी दिली आहे.

 

 

 

Comments are closed

error: Content is protected !!