पिंपरी, दि. १९(punetoday9news):- महापालिकेच्या वतीने करण्यात येणारी शहर सौंदर्यीकरणाची कामे वेगात सुरु असून बहुतांश सुशोभीकरणाच्या कामांची पूर्णत्वाकडे वाटचाल सुरु झाली आहे.
राज्य शासनाच्या नगर विकास विभागामार्फत राज्यातील सर्व नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये शहर स्तरावर दि. २ ऑक्टोबर ते दि.३१डिसेंबर २०२२ या कालावधीत “शहर सौंदर्यीकरण व स्वच्छता स्पर्धा २०२२” राबविण्यात येत आहे. या स्पर्धेतील निकषांमध्ये शहरातील मध्यवर्ती चौक, प्रमुख इमारती व रस्ते, भुयारी मार्ग, उड्डाणपूल, तलाव, जलाशये, शिल्प, कारंजे, प्रमुख वारसा स्थळे, यांचे सुशोभीकरण करणे. तसेच प्रमुख ठिकाणी एलईडी प्रकाश योजना व रोषणाई करणे, झोपडपट्टी व गावठाण परिसराची स्वच्छता करून त्यांचे सुशोभीकरण करणे, घरोघरी जाऊन कचरा संकलन करणे, शहर कचरामुक्त करणे, ओला व सुका कच-याचे विलगीकरण, प्लास्टिक बंदी,स्वच्छता कर्मचा-यांना शासकीय योजनांचा लाभ देणे, नाविन्यपूर्ण योजना राबविणे, कचरा मुक्त वार्ड, रस्त्यांची सफाई, कचरा कुंडी मुक्त वार्ड, नेहमी कचरा दिसणाऱ्या ठिकाणचे सुशोभीकरण करणे आदी कामांचा समावेश आहे.
महापालिकेच्या वतीने ९०दिवसीय सौंदर्यीकरण स्पर्धेच्या अनुषंगाने कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यानुसार शहरातील राजीव गांधी पुल परिसर, सांगवी फाटा, रक्षक चौक, साई चौक जगताप डेअरी, काळेवाडी फाटा, डांगे चौक, संत तुकाराम महाराज पूल चौक, मुकाई चौक, भक्ती शक्ती चौक, खंडोबा माळ चौक, चिंचवड स्टेशन चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, नाशिक फाटा चौक, घरकुल चौक, स्पाईन रोड, या ठिकाणी कार्बिंग दुरुस्ती,आकर्षक रंगरंगोटी, रस्त्यांची दुरुस्ती तसेच आवश्यक वाहतूक बेटांचे सुशोभीकरण करण्याचे काम सुरु असून येथे दिशादर्शक फलक लावणे, पेव्हिंग ब्लॉक बसविणे, झाडांना ओटे बांधणे, पार्किंगबिहारी वाजपेयी उद्यान, मधुकरराव पवळे उड्डाणपूल आदी ठिकाणी रोपांची लागवड करण्यासाठी मातीची व्यवस्था करून सुशोभित रोपांची लागवड करण्यात आली आहे. तसेच विविध इमारतींच्या ठिकाणी आकर्षक कुंड्यांची मांडणी करून सुशोभिकरण करण्याचे काम सुरु आहे. निगडी ते दापोडी रस्त्याच्या ठिकाणी रस्ते दुभाजक दुरुस्त करून रोपांची लागवड करण्यात येणार आहे, उड्डाणपुलाच्या ठिकाणी म्युरल्स व आकर्षक पेंटिंग तसेच अर्बन स्ट्रीट डिझाईन यानुसार कामे करण्यात आली आहेत.
थेरगाव रुग्णालय येथे प्रसूती विभाग व लहान मुलांच्या विभागात भिंतीवर आकर्षक रंगकाम करणे, केसपेपर, मेडिकल स्टोअर – रेलिंग करणे, प्रत्येक मजल्यावर दिशादर्शक व फ्लोअर प्लान लावणे, रुग्णालयाच्या समोरील सिमाभिंतीवर रंगरंगोटी करणे, हर्बल गार्डन, व्हर्टीकल गार्डन, टेरेस गार्डन तयार करण्याचे काम सुरु आहे.
“शहर सौंदर्यीकरण व स्वच्छता स्पर्धा २०२२” च्या अनुषंगाने महापालिकेच्या विविध विविध विभागांनी करावयाची कामे व त्यांच्या जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आल्या आहेत. त्यानुषंगाने स्वच्छतेची कामे देखील झपाट्याने पूर्ण करण्यात येत आहे. स्पर्धेतील विजेत्या नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांना महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पारितोषिक वितरीत करण्यात येणार आहे. दि. ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत सर्व कामे पूर्ण होतील त्यानुसार नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी दिली.
Comments are closed