लहान बाळांवरील “या” प्रत्येक शस्त्रक्रियेसाठी तीन लाख रुपये देण्याचा घेतला निर्णय.
पिंपरी, दि. १९ (punetoday9new):- जन्मतःच ऐकू न येणाऱ्या (जन्मतःच कर्णबधीर) लहान बाळांवर राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम व एडीआयपीच्या अंतर्गत मोफत उपचार करण्याची योजना आहे. त्याच्या धर्तीवर राज्य सरकारने सुद्धा योजना राबवण्यासाठी सहानुभूतीपूर्वक विचार करावा, अशी मागणी आमदार लक्ष्मण जगताप यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती. मुख्यमंत्र्यांनी त्याची दखल घेत जन्मतःच ऐकू न येणाऱ्या लहान बाळांवर शस्त्रक्रियेसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत देण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.
अशा प्रत्येक शस्त्रक्रियेसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून तीन लाख रुपये देण्यात येणार आहेत. आमदार जगताप यांच्या मागणीनंतर घेतलेल्या या निर्णयामुळे महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यात जन्मतःच ऐकू न येणारे बालक असलेल्या गोरगरीब कुटुंबांना मोठा आर्थिक आधार मिळणार आहे.
जन्मतःच कानाने ऐकू न येणाऱ्या लहान बालकांसाठी केंद्र व राज्य शासनाकडून राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम व एडीआयपीच्या अंतर्गत कॉकलीअर इम्प्लांट सर्जरी (Cochlear Implant Surgery) केली जाते. ही योजना १ एप्रिल २०१३ पासून देशातील व महाराष्ट्रातील सर्व जिल्हयांत लागू करण्यात आली आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात राहणाऱ्या गोरगरीब कुटुंबांतील असंख्य लहान बाळांना जन्मतःच ऐकू येत नसल्याचे वास्तव आहे. अशा लहान बाळांवर शस्त्रक्रियेसाठी केंद्र शासनाने राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमासारखे मोठे कवच तयार केलेले असताना देखील शासनानेच नेमून दिलेली अनेक रुग्णालये शस्त्रक्रियेसाठी संबंधित बाळाच्या कुटुंबाकडून पैशाची मागणी करतात.
पैसे नसल्यामुळे अनेक गोरगरीब कुटुंब आपल्या लहान बाळांवर उपचार करण्यासाठी टाळाटाळ करत असल्याचे वास्तव आहे. संबंधित बाळांवर वेळेत उपचार न झाल्याने वेळ निघून जाते आणि त्या बाळाचे वय वाढत जाते. अनेक लहान बाळांना पुढे आयुष्यभर कर्णबधीरच राहावे लागते. हे भीषण वास्तव बदलावे आणि जन्मतःच ऐकू न येणाऱ्या महाराष्ट्रातील प्रत्येक बाळांवर यशस्वी मोफत शस्त्रक्रिया व्हावी यासाठी केंद्राच्या योजनेच्या धर्तीवर राज्य सरकारनेही योजना राबवण्याबाबत सहानुभूतीपूर्वक विचार व्हावा, अशी मागणी आमदार लक्ष्मण जगताप यांनी १४ ऑक्टोबर २०२२ रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती.
त्याची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी जन्मतःच ऐकू न येणाऱ्या बाळांवर केल्या जाणाऱ्या शस्त्रक्रियेचा (कॉकलीअर इम्प्लांट सर्जरी) मुख्यमंत्री सहाय्यता निधीत समावेश केला आहे. तसेच अशा प्रत्येक शस्त्रक्रियेसाठी तीन लाख रुपयांचा निधी देण्यात येणार आहे. आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मागणीनंतर मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यात जन्मतःच ऐकू न येणारे बालक असलेल्या गोरगरीब कुटुंबांना मोठा आर्थिक आधार मिळाला आहे. मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयाचे आमदार जगताप यांनी स्वागत केले आहे. गोरगरीब घरांतील लहान बाळांवरील शस्त्रक्रियेसाठी एवढी मोठी आर्थिक मदत देण्याबाबत मानवतेच्यादृष्टीकोनातून घेतलेल्या या निर्णयाबद्दल आमदार जगताप यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले आहेत.
Comments are closed