पुणे, दि. २३( punetoday9news):- पुणे महानगरपालिका, पॅड केअर, जनवानी संस्था व कमिन्स इंडिया फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यामाने, “अभया – सॅनिटरी वेस्ट डिस्पोजल” प्रकल्पाची सुरुवात, हुतात्मा बालवीर शिरीशकुमार माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय याठिकाणी उदघाटन कार्यक्रमाने झाली.
पुणे महानगरपालिकेच्या घनकचरा विभागप्रमुख आशा राऊत, शिक्षण अधिकारी (प्राथमिक विभाग) मिनाक्षी राऊत, शिक्षण अधिकारी (माध्यमिक विभाग) पोपट काळे, सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. केतकी घाटगे, कमिन्स इंडिया फौंडेशचे मुख्य वैद्यकीय अधिकारी, डॉ. दिपाली खोडे, वरीष्ठ महाव्यवस्थापक अमित लेले, सी. एस. आर. हेड सौजन्या वेगुरू, पॅड केअर कंपनीचे अजिंक्य धारिया, जनवाणी संस्थेचे मंगेश क्षिरसागर, वरिष्ठ आरोग्य निरीक्षक कांबळे व खरात, शाळेच्या मुख्याध्यापिका मेमाणे (प्राथमिक) व जाधव (माध्यमिक) व शाळेतील विद्यार्थिनींच्या उपस्थितीत हा उदघाटन समारंभ पार पडला.
आशा राऊत, मिनाक्षी राऊत,डॉ. दिपाली खोडे, सौजन्या वेगुरू यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उदघाटन झाले. ग्रामीण भागात अजूनही सॅनिटरी पॅड वापरण्याचे प्रमाण कमी आहे, तर शहरी भागात सॅनिटरी पॅडचे शास्त्रशुद्ध पद्धतीने विल्हेवाट लावण्याच्या सुविधा अपुऱ्या आहेत. यासाठी पुणे महानगरपालिका, पॅड केअर,कमिन्स इंडिया, जनवाणी यांच्या संयमाने ‘अभया’ – सॅनिटरी वेस्ट डिस्पोजल प्रकल्प इतर 40 महानगरपालिकेच्या शाळांमध्ये राबविण्यात येणार आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून शाळेतील मुलींना सॅनिटरी पॅड टाकून देण्यासाठी सॅनिटरी पॅड डिस्पोजल शाळेत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्याचप्रमाने डिस्पोजल बिन मध्ये टाकून दिलेल्या सॅनिटरी पॅडवर शास्त्रशुद्ध पद्धतीने प्रक्रिया करून त्यापासून इतर उपयोगी गोष्टी तयार करण्यात येतील.
कार्यक्रमाच्या वेळी अमित लेले व अजिंक्य धारिया यांनी देखील आपली मनोगत व्यक्त केले. आपल्या कुटुंबासमवेत किंवा मित्र-मैत्रिणींसोबत न लाजता मासिक पाळीबद्दल सकारात्मक चर्चा घडवून आणणे गरजेचे आहे. हा उपक्रम नक्कीच किशोरी मुलींना एक प्लॅटफॉर्म तयार करून देईल जिथे ‘अभया’ने त्यांना आपली मते, प्रश्न मांडता येतील. यामुळे मासिक पाळी बद्दल असणाऱ्या चुकीच्या संकल्पना, गैरसमज, न्यूनगंड दूर होण्यास देखील मदत होईल.
लैगिंक शिक्षणाच्या संदर्भात किशोर- किशोरींमध्ये जनजागृती करण्यासाठी आपल्याला वैयक्तिक, कौटुंबिक, सामाजिक आणि शैक्षणिक पातळीवर पुढाकार घेणे गरजेचे आहे. यातूनच भावी पिढीला उत्तम शारीरिक व मानसिक आरोग्य लाभेल असे मत सर्व मान्यवरांनी आपल्या मनोगतात मांडले.
कार्यक्रमाचे सूत्र-संचालन शिक्षक राठी यांनी केले व कमिन्स इंडियाचे वृंदा देसाई यांनी सर्व मान्यवरांचे व उपस्थितांचे आभार मानले.
Comments are closed