दापोडी,दि.30( punetoday9news):-
दापोडी-बोपोडी रस्त्यावरील बुद्धविहारासमोर रस्त्याचे काम सुरू असून, ते संथ गतीने सुरू आहे. येत्या सहा डिसेंबरपूर्वी म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनापूर्वी हे काम पूर्ण करण्यात यावे, अशी मागणी छावा मराठा संघटनेचे पुणे जिल्हाप्रमुख रामभाऊ जाधव यांनी केली आहे.
दापोडीतील बुद्ध विहारात दरवर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी अभिवादन करण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होते. मात्र, यंदा रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे. महापालिका प्रशासनाने रस्त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. मात्र, हे काम संथ गतीने सुरू आहे. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या बांधवांची गैरसोय होण्याची शक्यता आहे.
मुख्य म्हणजे या रस्त्यावरून दापोडीतून बोपोडी, खडकी, तसेच पुणे विद्यापीठाकडे जाण्यासाठी नागरिक या रस्त्याचा वापर करतात. त्यामुळे या रस्त्यावर दिवसभर वर्दळ असते. नोकरीनिमित्त पुण्यात जाणारे नागरिक, विद्यार्थी, व्यापारी या सर्व घटकांसाठी हा रस्ता महत्त्वाचा आहे. रस्त्याच्या दुरावस्थेमुळे नागरिक व वाहनचालकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. आता ६ डिसेंबर रोजी महापरिनिर्वाण दिनी होणारी गर्दी लक्षात घेऊन प्रशासनाने येथील कामे तातडीने पूर्ण करावीत, अशी मागणीही रामभाऊ जाधव यांनी केली आहे.

 

 

 

 

 

Comments are closed

error: Content is protected !!