पिंपरी,दि. १( punetoday9news):-
पिंपळे गुरव परिसरात महापालिका व स्मार्ट सिटी अंतर्गत सुरू असलेली कामे अद्यापही अर्धवट अवस्थेत असून ती लवकर पूर्ण करावी या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहर कार्याध्यक्ष शामभाऊ जगताप यांनी महापालिका आयुक्तांना निवेदन दिले असून, स्मशानभूमीच्या समस्या सोडविण्याची मागणी केली आहे.

पिंपळे गुरवमध्ये महापालिका व स्मार्ट सिटी अंतर्गत चालू असलेली कामे बऱ्याच महिन्यापासून अर्धवट अवस्थेत आहेत. काही नगरामधील कामे पूर्ण झालेली आहेत. मात्र, स्मशान भूमीतील स्वच्छतागृह बंद आहे. पदपथाची कामे अपूर्ण आहेत. जाण्या-येण्याच्या मार्गावर दगड व मातीचे ढीग आहेत. विद्युत डीपी उघडे आहेत. त्यामुळे नागरिकांना धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. तसेच चेंबरचे झाकण उघडे असल्याने चेंबरमधील पाणी रस्त्यावर पसरले असून, त्यामुळे दुर्गंधी पसरत आहे. कचरा सर्वत्र रस्त्यावर पडलेला आहे, याचा त्रास अंत्यविधी करण्यासाठी आलेल्या नागरिकांना सहन करावा लागत आहे.

स्मशानभूमी संदर्भात पिंपळे गुरवमधील नागरिकांच्या तक्रारी वारंवार येत आहेत. नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी इथली कामे लवकरात लवकर पूर्ण होणे गरजेचे आहे. आता महापालिका आयुक्तांनीच या समस्यांकडे लक्ष द्यावे.
– शामभाऊ जगताप, माजी शहर कार्याध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस


 

 

 

 

 

 

#

Comments are closed

error: Content is protected !!