पुणे, दि. १२( punetoday9news):- राज्यातील सुरक्षित साहसी पर्यटनासाठी सुनियोजित व्यवस्था निर्माण करण्याच्या अनुषंगाने ‘साहसी पर्यटन उपक्रम धोरण’ राबवण्यात येत असून साहसी पर्यटन उपक्रम राबवणाऱ्या व्यक्ती, संस्था, सेवादाते कॅम्पस, रिसॉर्ट आदींनी पर्यटन संचालनालयाकडे नोंदणी करणे बंधनकारक आहे.
जिल्ह्यात काही साहसी पर्यटन केंद्रचालक झिपलाईन, ट्रेकिंग, वॉटर स्पोर्ट आदी उपक्रम विना नोंदणी राबवत असल्याचे निदर्शनास आले आहे. राज्यात पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाचा २४ ऑगस्ट २०२१ रोजीच्या शासन निर्णयानुसार ‘साहसी पर्यटन उपक्रम धोरण’ लागू करण्यात आले आहे. त्यानुसार साहसी पर्यटन उपक्रम राबवणाऱ्या संस्थांनी तात्काळ नोंदणी करावी. यापुढे विनानोंदणी साहसी उपक्रम चालवत असलेले निदर्शनास आल्यास नियमानुसार कठोर कारवाई करण्यात येईल, असे विभागीय पर्यटन कार्यालयाच्या सहायक संचालक सुप्रिया करमरकर- दातार यांनी कळवले आहे.
साहसी उपक्रम राबविणाऱ्या आयोजकांनी https://www.maharashtratourism.gov.in/ या पर्यटन संचालनालयांच्या संकेतस्थळावर ५०० रुपयांचे चलन https://gras.mahakosh.gov.in/echallan या लिंक वर भरून नोंदणी करावी. अधिक माहतीसाठी विभागीय पर्यटन कार्यालय, एमटीडीसी कर्यालय शेजारी. ‘आय बरॅक’ मध्यवर्ती बिल्डिंग, ससून रुग्णालया शेजारी, पुणे (भ्रमणध्वनी क्र. ८०८००३५१३४) येथे संपर्क साधावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.
Comments are closed