आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्याकडून सार्वजनिक आरोग्य विभागातील सर्वांचे अभिनंदन

पुणे दि.१६ ( punetoday9new):- माता आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करून माता मृत्यू दर कमी करण्यासाठी तसेच प्रसूतीदरम्यान पुरविल्या जाणाऱ्या सुविधांची गुणवत्ता वाढविण्यासाठी लक्ष्य संस्था प्रमाणिकरणामध्ये महाराष्ट्राला राष्ट्रीय स्तरावर दोन पुरस्कार प्राप्त झाले आहेत. या यशाबद्दल राज्याचे आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी सार्वजनिक आरोग्य विभागाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे विशेष अभिनंदन केले आहे.

शाश्वत विकास ध्येय (SDG) साध्य करण्यासाठी आणि देशातील माता मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी माता आरोग्य केंद्रात नाविन्यपूर्ण योजनांच्या देवाणघेवाणीबाबत विचार विनिमयासाठी नवी दिल्ली येथे राष्ट्रीय मातृत्व आरोग्य कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. माता मृत्यू कमी करण्यासाठी आयोजिण्यात आलेल्या या कार्यशाळेची मुख्य संकल्पना ‘टाळता येण्याजोगे माता मृत्यू शून्य करण्यासाठी प्रयत्न’ अशी होती.

माता आरोग्याच्या क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल राज्यांना पुरस्कार देण्यात आले आहेत. नोव्हेंबर २०२२ मध्ये रजिस्ट्रार जनरल इंडियाने प्रकाशित केलेल्या नमूना नोंदणी प्रणालीच्या सर्वेक्षण अहवालानुसार सन २०१७-१९ मध्ये देशातील मातामृत्यु प्रमाण १०३ प्रति लक्ष जिवंत जन्म वरुन सन २०१८-२० मध्ये ९७ प्रति लक्ष जिवंत जन्म इतका झालेला आहे आणि महाराष्ट्र राज्यामध्ये मातामृत्यू प्रमाण सन २०१७-१९ च्या ३८ प्रति लक्ष जिवंत जन्म वरुन सन २०१८-२० मध्ये ३३ प्रति लक्ष जिवंत जन्म झाला आहे. देशामध्ये मातामृत्यूचे प्रमाण कमी करण्यावर महाराष्ट्र राज्य दुसऱ्या स्थानावर आहे तर पहिल्या स्थानावर केरळ राज्य आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाने जननी सुरक्षा योजना, जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम, प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान, मातृत्व अनुदान योजना, मानव विकास कार्यक्रम, प्रधानमंत्री मातृ वंदना योजना इत्यादी योजना प्रभावीपणे राबवल्या तसेच सुरक्षित मातृत्वासाठी विविध उपाय योजना राबवल्यामुळे राज्याला हे साध्य करता आले.

राष्ट्रीय स्तरावर लक्ष्य संस्था प्रमाणिकरणासाठी महाराष्ट्राला द्वितीय पुरस्कार

लक्ष संस्था प्रमाणिकरणामध्ये महाराष्ट्राला राष्ट्रीय स्तरावर द्वितीय पुरस्कार प्राप्त झाला आहे. केंद्र सरकारने प्रसूतीदरम्यान पुरविल्या जाणाऱ्या सुविधांची गुणवत्ता वाढविण्याकरीता डिसेंबर २०१७ मध्ये लक्ष्य (LaQshya) कार्यक्रमाला सुरुवात केलेली आहे. प्रसूतीगृह आणि माता शस्त्रक्रियागृहमध्ये गुणवत्ता सुधारणा करुन त्याद्वारे माता मृत्यू, उपजत मृत्यू आणि नवजात अर्भक मृत्यू कमी करणे तसेच प्रसूतीदरम्यान दर्जात्मक सेवेसोबतच मातृत्वाची काळजी घेणे हे या कार्यक्रमाचे प्रमुख उद्दिष्ट्य आहे. लक्ष्य २०१७ च्या मार्गदर्शक सूचनानुसार राज्यात सन २०१८-१९ पासून लक्ष्य कार्यक्रम महाराष्ट्र राज्यात राबविण्यात येत आहे.

महिला व बालकाचे आरोग्य सुधारण्यासाठी तसेच आरोग्य यंत्रणा बळकट करण्यासाठी राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री मा. डॉ. तानाजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली राज्याला हे मोठे यश मिळाले आहे. दिल्ली येथे केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या शुभहस्ते हे दोन्ही पुरस्कार डॉ. अशोक नांदापुरकर, उपसंचालक, कु.क. पुणे व डॉ. अनिरुध्द देशपांडे, सहाय्यक संचालक व नोडल अधिकारी, माता आरोग्य, कु. क. पुणे यांनी स्वीकारले.

राष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट काम केल्याबद्दल आशा व परिचारिका गटात महाराष्ट्र राज्याला द्वितीय पुरस्कार गोंदिया जिल्ह्यातील डव्वा प्राथमिक आरोग्य केंद्रातील आशासेविका गीता चोपराम भेंडारकर व परिचारिका पंचफुला राणे यांना देण्यात आला.

पुणे येथे आयोजित बैठकीत मंत्री सावंत यांनी सर्वांचे अभिनंदन केले. यावेळी आरोग्य सेवा संचालक डॉ.नितीन आंबाडेकर, सहसंचालक डॉ.भोये, डॉ.रामचंद्र हंकारे , डॉ.अशोक नंदापूरकर , डॉ.अनिरुद्ध देशपांडे व इतर अधिकारी उपस्थित होते.

 

 

#

Comments are closed

error: Content is protected !!