पुणे ( punetoday9news):- सांगली जिल्ह्यातील भोसे गावातील ४०० वर्षे पुरातन वटवृक्षाला वाचविण्यासाठी सर्व निसर्गप्रेमींनी जोर लावून लढा उभारला होता त्याला अखेर यश मिळाल्याची माहिती मिळाली आहे. केंद्रीय भूपृष्ठ मंत्री नितिन गडकरी यांनी या रस्त्याच्या संरेखनात बदलाचे आदेश दिले आहेत. 
रत्नागिरी कोल्हापूर – मिरज – सोलापूर या राष्ट्रीय महामार्ग क्र . १६६ चे काम सुरु आहे  तथापि , मिरज ते पंढरपूर या शहरांच्या दरम्यान हा महामार्ग मोजे भोसे ( तालुका मिरज , जि.सांगली ) या गावातून देखील जातो . मोजे भोसे गावातील गट क्र .४३६ येथे यल्लमा देवीचे पुरातन मंदीर असून या मंदिरासमोरच सुमारे ४०० वर्षापूर्वीचा महाकाय वटवृक्ष आहे . त्याचा विस्तार सुमारे ४०० चौ.मी. इतका व्यापक आहे . हा वटवृक्ष त्या परिसरातील एक ऐतिहासिक ठेवा तर आहेच , त्याचबरोबर ते वटवाघुळ आणि इतर दुर्मिळ पक्षी यांच्याकरीता नैसर्गिक निवासस्थान व आधार देखील आहे . तथापि , नियोजित राष्ट्रीय महामार्ग क्र . १६६ च्या कामामुळे या पुरातन वटवृक्षास बाधा पोहोचत असल्याने वटवृक्ष तोडावे लागेल किंवा पर्यायी जागेवरुन रस्ता करावा लागेल असे मिरज उपविभागीय अधिकारी यांच्या अहवालात नमूद केले होते  .
या वटवृक्षाचे ऐतिहासिक महत्व लक्षात घेता तसेच परिसरातील पर्यावरणाच्या होणाऱ्या -हासाचा विचार करता मौजे भोसे येथील संबंधीत जागेवरील महामार्गाचे संरेखन काही प्रमाणात बदलून वटवृक्षाचे जतन होण्याबाबत कार्यवाही करण्याची विनंती स्थानिक नागरिक, झाड बचाओ आंदोलनकर्ते, पर्यावरण प्रेमी यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना केली होती. याची दखल घेत त्यांनी केंद्रीय भूपृष्ठ मंत्री नितिन गडकरी यांना पत्राद्वारे झाड वाचवण्यासाठी विनंती केली होती.
त्यानुसार नितीन गडकरी यांनी आदेश काढून रस्त्याच्या संरेखनात किंचित बदल करण्यास परवानगी दिल्याची माहिती मिळाली आहे. त्याबाबत पर्यावरण प्रेमी व स्थानिक नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे.

Comments are closed

error: Content is protected !!