पिंपरी,दि.२० (punetoday9new):- आज लावणी सादरीकरणात कमालीचा विक्षिप्तपणा आला आहे. त्यामुळेच लावणीवर प्रेम करणारा रसिक लावणीपासून दुरावत चालला आहे. त्यामुळे या रसिकवर्गाला आपल्याकडे खेचण्यासाठी लावणीतील सौंदर्य जपणे गरजेचे बनले आहे. चांगल्या दर्जाची लावणी पाहण्यासाठी रसिकांनी निर्धास्तपणे यावे, असे आवाहन ‘लाखात देखणी’ फेम लावणीसम्राज्ञी दीप्ती आहेर यांनी केले.

पांडव निर्मित ‘चौफुला’चे तब्बल दीड हजाराहून जास्त प्रयोग.
दीप्ती आहेर यांनी आपला लावणी सादरीकरणाचा प्रवास उलगडून दाखवला. पांडव निर्मित ‘चौफुला’ कार्यक्रमाचे तब्बल दीड हजाराहून जास्त प्रयोग केले. ठसकेबाज लावणीतून या कार्यक्रमाला वेगळ्या उंचीवर नेऊन बसविले. लावणीवरील प्रेमापोटी आणि लावणी जपण्याच्या उद्देशाने स्वतःला झोकून दिले होते. आजपर्यंत लावणीच्या फडापासून दूर असलेल्या महिला वर्गाला माझ्या लावणीने आकर्षित केले आणि महिलांच्या प्रतिसादाने लावणी एका वेगळ्या उंचीवर नेण्यात यश आले.

विजय उल्पे निर्मित ‘राजसा तुम्हासाठी’ने दिली उभारी :
चौफुला बंद झाल्यानंतर विजय उल्पे निर्मित ‘राजसा तुम्हासाठी’ या कार्यक्रमात सहभागी झाले. या कार्यक्रमांनी तर वेगळा उच्चांक गाठला. आपल्या वेगळ्या अदाकारीने या कार्यक्रमाला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले आणि महाराष्ट्र आम्ही तब्बल १८९३ प्रयोग केले. यात्रा जत्रांसाठी बाहेर असल्याने माझ्या मे मधल्या वाढदिवसाला एकदाही घरी उपस्थिती दाखवू शकले नाही, याची खंत आहेच.

लावणीला १९९७ पासून सुरुवात :
आजवर आपण लावणीचे दोन हजारांहून जास्त प्रयोग केले. सांगली, कोल्हापूर म्हणजे आमचे माहेरघरच. या भागात सलग वीस वीस दिवस आम्ही लावणीचे कार्यक्रम केले. लावणीला साधारणतः १९९७ पासून सुरुवात केली. त्या अगोदर म्हणजे शालेय कार्यक्रमात लावणी सादर करून उत्स्फूर्त दाद मिळवली. शालेय शिक्षणानंतर ‘महाराष्ट्राची लोकधारा’ या कार्यक्रमातून लावणीतील करिअरला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. घरातून पाठिंबा होता. मात्र, त्यांनी माझी लावणी सादर करण्याची पद्धत बघितल्यानंतर विरोध मावळला. त्यानंतर मागे वळून पाहिले नाही.

ज्येष्ठ लावणीसम्राज्ञी शकुंतला नगरकरांच्या शिकवणुकीनुसारच लावणी सादर.

आपली लावणी लहानांपासून आबालवृद्ध, महिला, पुरुष एकत्रित बघू शकतील, याच उद्देशाने आता ‘लाखात देखणी’ कार्यक्रमाची निर्मिती केली आहे. या माध्यमातून लावणीचे पावित्र्य जपण्याचा पुरेपुर प्रयत्न असतो. माझ्यासोबत काम करणाऱ्या सर्व मुली या शिक्षित आहेत. त्यामुळे लावणीचा ढंग, बाज, ठसकेबाजपणा न सोडता सादरीकरण होते. ज्येष्ठ लावणीसम्राज्ञी शकुंतला नगरकर यांनी घालून दिलेल्या शिकवणुकीनुसारच लावणी सादर करण्याचा कटाक्ष असतो. लावणीतील अदाकारी त्यांनीच शिकवली आहे. अकलूजच्या लावणी महोत्सवाची तीन वेळा विजेती झाली आहे, ती लावणीतील वैविध्यपूर्ण सदारीकरणामुळेच. आधुनिक पद्धतीने पारंपरिक लावणी अश्लीलला टाळून सादर करण्यावर आजही भर दिला जात आहे.

प्रेक्षकांचा धांगडधिंगाच करतोय लावणीला नाट्यगृहाचे दरवाजे बंद .
आज नाट्यगृहांमध्ये लावणी सादर करतेवेळी प्रेक्षकांचा धांगडधिंगाच लावणीसाठी नाट्यगृहाचे दरवाजे बंद होण्याला कारणीभूत आहे. मात्र, शिस्तबद्ध लावणीसाठी नाट्यगृह मिळायला हवीत. पूर्वी लावणी सादर करताना असुरक्षित कधीच वाटले नव्हते. आज जुने रसिकही लावणी पहायची इच्छा असूनही केवळ सादरीकरणातील चित्रविचित्रपणामुळे नाट्यगृहांकडे फिरकत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. कसेही कपडे घालून लावणी सादर केली जाते, ही चिंतेची बाब आहे. अशा सादरीकरणाला रसिकांनी दाद दिली नाही पाहिजे. आज लावणी जपण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. खऱ्या कलाकारांना प्रेम द्या. केवळ अंगप्रदर्शन केले म्हणजे लावणी उत्कृष्ट झाली असे नाही, तर पूर्ण अंग झाकूनही लावणीतील सौंदर्य न्याहाळता येते.

 

 

 

 

#

Comments are closed

error: Content is protected !!