पुणे, दि. ३१: जिल्हास्तरीय युवा महोत्सव २ जानेवारी २०२३ रोजी सकाळी ९.३० वाजता डॉ. ए. आर. शेख असेंब्ली सभागृह, आझम कॅम्पस, पुणे येथे आयोजित करण्यात येणार आहे अशी माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे यांनी दिली.
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, राष्ट्रीय एकात्मता विदयार्थी संघटना, पूना महाविद्यालय व महाराष्ट्र कॉस्मोपोलिटन एज्युकेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने या महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. यामध्ये लोकनृत्य तसेच लोकगीत स्पर्धा असणार आहे. युवा महोत्सवात सहभागी होण्यासाठी जिल्ह्यातील कलाकार, स्पर्धकांनी आपले प्रवेश अर्ज जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या dsopune6@gmail.com या ई-मेल पत्त्यावर तसेच प्राध्यापक आशद शेख ८४८४८०३५२९ आणि क्रीडा अधिकारी शिल्पा चाबुकस्वार ९५५२९३१११९ या व्हॉट्सॲप क्रमाकांवर १ जानेवारी दुपारी १ वाजेपर्यंत पाठवावे.
युवा महोत्सवाच्यातील स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रवेशिकेसोबत जन्मतारखेचा पुरावा आधारकार्ड, जन्म तारखेचा दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाचे प्रमाणपत्र यापैकी एक कागदपत्र जोडावे. स्पर्धकाचा अद्यावत व्हॉट्सअप भ्रमणध्वनी क्रमांक व ई-मेल पत्ता नोंदवावा. दिलेल्या वेळेतच स्पर्धकाने सादरीकरण करणे आवश्यक राहील.
युवा महोत्सव कार्यक्रमांत बदल करण्याचा वेळापत्रक बदल किंवा रद्द करण्याचा अधिकार आयोजन समितीने राखून ठेवला आहे. परिक्षकांचा निर्णय हा अंतीम व बंधनकारक राहील. त्याबाबतचा कोणताही लेखी अथवा तोंडी आक्षेप किंवा तक्रार स्वीकारली जाणार नाही. मागील तीन वर्षात राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी झालेल्या कलाकार युवक-युवतींना सहभागी होता येणार नाही.
लोकगीतमध्ये १० कलाकारांचा समावेश राहील. अंतीम निकाल गायनाची गुणवत्ता यावर निश्चित केला जाईल. मेकअप, वेशभूषा व संघाच्या हावभाव क्रिया (ॲक्शन) याबाबी अंतीम निकालासाठी गृहीत धरल्या जाणार नाहीत. लोकगीत हे कोणत्याही प्रादेशिक भाषेतील असावे. लोकगीतामध्ये चित्रपट गीत गाण्यास परवानगी दिली जाणार नाही.
लोकनृत्य या कलेमध्ये २० कलाकारांचा समोवश राहील. संघ हा मुले, मुली किंवा एकत्रीत असणे आवश्यक आहे. ताल, नृत्य दिग्दर्शन, पोषाख, मेकअप, संच, एकत्रीत परिणाम या बाबीवरुन अंतीम निकाल काढण्यात येईल. लोकनृत्यासाठी पूर्वध्वनीमुद्रीत टेप, कॅसेट, सीडी अथवा पेनड्राईव्हला परवानगी दिली जाणार नाही. लोकनृत्याचे गीत चित्रपटबाह्य असावे.
सर्वच बाबींसाठी सादरीकरण संकल्पनेवर आधारित व सार्वजनिक नियमांचे पालन करणारे असणे बंधनकारक राहील. आवश्यक साहित्य सबंधितास आणावे लागेल. युवा महोत्सवात स्पर्धकांना शिस्तीचे पालन करणे आवश्यक आहे. आपला प्रवेश अर्ज, विहीत नमुन्यात सादर करण्यात यावा.
स्पर्धकांसाठी, कलाकारांसाठी वयोगट १५ ते २९ वर्षे असा राहील. स्पर्धकांचे वय १२ जानेवारी २०२३ रोजी किमान १५ व जास्तीत जास्त २९ असावे. नाव नोंदणी करताना प्रवेशिकेसोबत आपले आधार कार्ड व जन्माचा दाखला जोडणे आवश्यक आहे. यासाठी शाळेचे ओळखपत्र ग्राह्य धरण्यात येणार नाही. जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालय, कला अकादमी, संस्थेतील अधिकाधिक इच्छुक कलावंत, स्पर्धकांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Comments are closed