“तडफदार नेतृत्व काळाने हिरावले”
मुंबई, दि. ३(punetoday9news):- “नगरसेवक, महापौर ते विधिमंडळातील तडफदार प्रतिनिधी म्हणून आपल्या कामाचा ठसा उमटवणारे नेतृत्व काळाने हिरावून नेले आहे,” अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे, तसेच दिवंगत जगताप यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.
आमदार जगताप यांनी स्वकर्तृत्वाने कारकीर्द घडवली. पिंपरी -चिंचवडचा विकास हा त्यांचा ध्यास होता. नगरसेवक, स्थायी समिती अध्यक्ष, महापौर म्हणून त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला. विधिमंडळातही ते आपला मतदारसंघ आणि परिसरातील समस्या, अडचणी यासाठी हिरीरीने काम करत असत. लोकहिताच्या दृष्टीने अनेकदा त्यांनी संघर्षशील भूमिका घेतली. आजारपणाशीही त्यांचा प्रदीर्घ लढा सुरू होता. यातही त्यांनी आपले कर्तव्य बजावताना कुचराई केली नाही. पण नियतीला हे मान्य नसावे आणि आमदार जगताप यांना काळाने हिरावून नेले. हा त्यांच्या परिवारासह, कार्यकर्ते, चाहत्यांसाठी मोठा आघात आहे. जगताप कुटुंबियांना या आघातातून सावरण्यासाठी बळ मिळो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. लोकप्रिय आमदार लक्ष्मण जगताप यांना भावपूर्ण श्रद्धांजली! असेही मुख्यमंत्र्यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.
Comments are closed