शहराची गाव ते शहर ओळख निर्माण करण्यात महत्वाची भुमिका.
नगरसेवक, महापौर ते आमदार असा संघर्षमय राजकीय प्रवास.
सांगवी, दि. ३ :- पिंपरी-चिंचवड शहरातील चिंचवड विधानसभेचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनाने परिसरात शोकमय वातावरण पसरले आहे . राजकीय वारसा नसताना राजकीय संघर्षातून नगरसेवक ते आमदार पर्यंत झेप घेणारा कार्यकर्त्यांच्या गराड्यातील लोकभावना जपणारा नेता म्हणून त्यांची ओळख होती. शहरातील राजकारणाचे प्रमुख सत्ताकेंद्र म्हणूनही त्यांची छाप होती.
पिंपळे गुरव मधून त्यांची राजकीय वाटचाल सुरू झाली. पिंपळे गुरव, सांगवी, नवी सांगवी, पिंपळे सौदागर, पिंपळे निलख, वाकड अशी आताची उपनगरे पुर्वी गाव रूपात होती. प्राथमिक दळणवळणाच्या सुविधेपासून रस्ते, पाणी, वीजपुरवठा अशा सर्व समस्या सोडवण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. त्यांच्या राजकीय प्रवासाच्या आलेखाप्रमाणे उपनगरांच्या विकासाचाही आलेख झपाट्याने वाढला. शैक्षणिक, आर्थिक, सांस्कृतिक क्षेत्रात मोठा बदल झाला. मतदारसंघातील नागरिकांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देण्यात मोलाचा वाटा त्यांनी उचलला. अनधिकृत बांधकाम संदर्भात घेतलेली राजकीय भुमिका ही महाराष्ट्र भर चर्चेचा विषय ठरली. महत्वाचा व रहिवास्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असल्याने याच मुद्यावर महापालिकेतील सत्तांतर झाले.
आज आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनाची बातमी सर्व समाजमाध्यमामध्ये पसरताच परिसरात शांतता पसरली. अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने व्यावसायिकांनी बंद केली. कार्यकर्ते, नागरिकांकडून शोक व्यक्त करण्यात आला. इतर रस्त्यावर शुकशुकाट पसरला असताना पिंपळे गुरव गावठान परिसरात अंत्यदर्शनासाठी नागरिकांची तुडुंब गर्दी झाली होती.
निधनानंतर त्यांचे पार्थिव पिंपळे गुरव येथील त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेच्या सभापती डॉ. निलम गोऱ्हे, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आरोग्य मंत्री तानाजी सावंत, सहकार मंत्री अतुल सावे, खासदार श्रीनिवास पाटील, आमदार महेश लांडगे, आमदार आण्णा बनसोडे, विधान परिषदेच्या आमदार उमा खापरे, आमदार श्रीकांत भारतीय, माजी मंत्री बाळा भेगडे, विजय शिवतारे, माजी आमदार विलास लांडे महापालिका आयुक्त शेखर सिंह, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार चौंबे, जिल्हाधिकारी राजेश देशमुख, पीएमआरडीएचे आयुक्त राहुल महिवाल आदींसह शहरातील सर्वपक्षीय नेत्यांनी व पदाधिकाऱ्यांनी अंत्यदर्शन घेतले.
सायंकाळी फुलांनी सजविलेल्या गाडीतून पिंपळेगुरव येथील निवासस्थान ते गावठाणातील मैदानापर्यंत अंत्ययात्रा काढण्यात आली. सायंकाळी साडेपाच वाजता त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
राजकीय जीवन परिचय.
जन्म १५ फेब्रुवारी १९६३
शेती प्रमुख व्यवसाय.
१९८६ मध्ये पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणूक लढवली.
सलग २१ वर्षे ते पिंपरी-चिंचवड महापालिकेचे नगरसेवक.
१९९३ मध्ये महापालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदी.
२००० मध्ये महापौर.
२००२ राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष.
२००४ पुणे जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची निवडणूक अपक्ष लढवून विजयी.
२००८ मध्ये लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघांची पुनर्रचना. चिंचवड विधानसभा मतदारसंघ अस्तित्वात.
२००९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत चिंचवड मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवून विजय.
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी मावळ लोकसभा निवडणूकीत पराभव.
२०१४ भाजपमध्ये प्रवेश
२०१४ मध्ये चिंचवड विधानसभा मतदारसंघातून पुन्हा विजयी.
शहरातील भाजपचे पहिले आमदार.
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या तिकीटावर चिंचवड विधानसभा मतदारसंघातून पुन्हा विजयी.
शहरातील सलग तिसऱ्यांदा निवडून येणारे ते पहिले आमदार म्हणूनही लौकिक .
Comments are closed