पुणे दि. ११ :-  महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ चे ६८ व ८४ कलमानुसार अवैध मद्य विक्री करणाऱ्यांविरुद्ध तसेच अवैध ठिकाणी मद्य सेवन करणाऱ्या ग्राहकांविरुद्ध जिल्ह्यात ७ ते ९ जानेवारी दरम्यान विशेष मोहिम राबवून एकूण २९ गुन्हे नोंदविण्यात आले आहेत, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पुणे कार्यालयाने दिली आहे.

या कारवाईत अटक करण्यात आलेल्या आरोपींना न्यायालयामध्ये हजर केल्यानंतर २५ आरोपींना दोषी ठरविण्यात आले असून न्यायालयाकडून या आरोपींना एकूण ३७ हजार रुपये दंड करण्यात आला आहे. यापूर्वी सप्टेंबर २०२२ ते ३१ डिसेंबर २०२२ या कालावधीमध्ये अशा प्रकारचे एकूण ३५ गुन्हे नोंदविण्यात आले होते. त्यामधील एकूण ७१ आरोपींना न्यायालयाने दोषी ठरवून १ लाख २७ हजार ८०० रुपये इतका दंड करण्यात आला आहे.

याशिवाय अवैध मद्य निर्मिती वाहतूक व विक्रीचे समुळ उच्चाटण करण्यासोबतच गुन्हेगारांना वचक बसविण्याकरीता राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाने चालू वर्षामध्ये ३८२ सराईत आरोपींकडून चांगल्या वर्तणुकीचे बंधपत्र घेण्यासाठी सक्षम प्राधिकाऱ्यांना प्रस्ताव सादर केलेले आहे. तसेच एमपीडीए अंतर्गत कारवाईसाठी एकूण १७ प्रस्ताव व मोक्काअंतर्गत २ प्रस्ताव संबंधित सक्षम प्राधिकाऱ्यांकडे देण्यात आले आहेत. अधिक दराने मद्य विक्री करणारे दारु विक्री दुकान व देशी दारु बार अनुज्ञाप्तीधारकाविरुद्ध एकुण १० विभागीय गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

अधिक्षक राज्य उत्पादन शुल्क कार्यालयाच्यावतीने वर्ष २०२१-२२ पेक्षा वर्ष २०२२-२३ मध्ये एकूण नोंदविलेल्या गुन्ह्यांमध्ये ४३५ ने वाढ झालेली आहे. तर अटक आरोपी संख्येमध्ये ५९६ ने वाढ झालेली आहे. जप्त वाहनांच्या संख्येत ७२ ने वाढ झाली असून जप्त मुद्देमालाच्या किंमतीमध्ये ५ कोटी ८६ लाख ४० हजार ६६२ रुपये इतकी वाढ झालेली आहे.

जिल्ह्यात अवैध मद्य निर्मिती, वाहतूक व विक्री करणाऱ्या विरुद्ध कारवाई करण्यात येत आहे. कोणत्याही नागरिकास अवैध मद्य निर्मिती, वाहतुक व विक्रीबाबत माहिती मिळाल्यास टोल फ्री क्र.१८००२३३९९९९ व दुरध्वनी क्र. ०२०-२६०५८६३३ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक चरणसिंह राजपुत यांनी केले आहे.

 

 

 

 

#

Comments are closed

error: Content is protected !!