पिंपरी, दि.१४:- मराठवाडा मुक्तीसंग्राम आणि भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त मराठवाडा मुक्तीसंग्रामातील स्वातंत्र्यसैनिक, हुतात्म्यांना मानवंदना देणे, मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासासाठी ‘मराठवाडा व्हीजन २०३०’ तयार करण्यासाठी आयोजित स्वामी रामानंद तीर्थ जन्मस्थळ ते समाधीस्थळ ‘पवित्र माती मंगल कलश संवाद यात्रेचा प्रारंभ संतश्रेष्ठ तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे यांच्या हस्ते श्री क्षेत्र देहुगाव येथे झाला.
संतश्रेष्ठ तुकाराम महाराज व ज्ञानेश्वर महाराजांच्या जयघोषात अभियंते नितीन चिलवंत, शिवकुमारसिंह बायस, विशाल घाटे, ज्ञानेश्वर पवार यांना मंगल कलश घेऊन पुढील यात्रेसाठी मार्गस्थ करण्यात आले. यावेळी संत ज्ञानेश्वर महाराज आळंदी देवस्थानचे अध्यक्ष योगेश देसाई आंबेवाले, प्रा.डॉ.प्रवीण घाटे, ह.भ.प.पांडुरंग शास्त्री शितोळे, देहू संस्थानाचे व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, पिंपरी चिंचवड शहर विरोधी पक्ष नेते एकनाथ दादा पवार यांचे बंधू उद्योजक मोतीराम पवार, मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष अरुण पवार, डॉ. प्रीती काळे, रेश्मा चिलवंत. दिलीपराव बारडकर, शिवकुमारसिंह बायस, राजेंद्र गाडेकर, महेश घोडके, डी एस राठोड, शंकर तांबे, सुनील भोसले, गोविंद दूधभाते, विठ्ठल काळोखे, सिताराम वैद्य, डॉ. यादव, प्रा. विकास कंद आदी उपस्थित होते.
मराठवाडा मुक्तीसंग्रामाचे प्रणेते स्वामी रामानंद तीर्थ यांना सर्वोच्च भारतरत्न पुरस्कार मिळावा, यासाठी शौर्य चिलवंत यानी राष्ट्रपती, पंतप्रधान, गृहमंत्री, राज्यपाल, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना पत्र देऊन नितीन मोरे महाराज यांच्या हस्ते साडेसात लाख पत्रे पाठविण्याचा संकल्प करण्यात आला. त्याचबरोबर मराठवाडा भवन निर्माण कार्यासाठी नितीन मोरे महाराज यांनी स्वयंपुर्तीने निधी देऊन मराठवाडा भवन निर्मितीसाठी आशीर्वाद दिले.
यावेळी बोलताना ह. भ. प. नितीन महाराज मोरे म्हणाले, की महाराष्ट्राची संस्कृती ही संत परंपरेचा वारसा चालवणारी आहे. त्यात मराठवाड्यातील संतांचे अतुल्य कार्य आहे.
दरम्यान, भरघोस योगदानाबद्दल जगद्गुरु श्री संत श्रेष्ठ तुकाराम महाराज मंदिरात मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष अरुण पवार, रेश्मा नितीन चिलवंत, शिवकुमार बायस यांचा सन्मान करण्यात आला.
Comments are closed