प्रा. हरी नरके यांच्या फेसबुक वाॅलवरून

नाशिकचे ३०-३५ जण कार्यक्रमाचे निमंत्रण द्यायला पुण्यात माझ्या घरी आले होते. त्यांची बसण्याची सोयही माझ्या छोट्या खोलीत मी करू शकत नव्हतो. त्यांना सगळ्यांना चहा दिला. सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त नाशिकच्या भव्य कालिदास नाट्यगृहात कार्यक्रम ठेवला असून तीन मंत्री येणार आहेत असे पदाधिकारी म्हणाले. त्यांची ओळख करून घेताना लक्षात आले की ते सगळेच कोट्याधीश बागायतदार, द्राक्ष व्यापारी, बिल्डर, हॉटेल व्यावसायिक वा राजकीय नेते होते. एव्हढे मोठे लोक आपल्याला बोलवायला आले म्हणल्यावर नाही म्हणण्याचा सवालच नव्हता.
त्यांनी विचारले,” तुमचे प्रवासखर्च व मानधन किती असेल?” मी म्हणालो, “एशियाडचा येण्याजाण्याचा प्रवास खर्च द्या. मी सध्या भारतीय कामगार चळवळीचे जनक नारायण मेघाजी लोखंडे ट्रस्टला निधी मिळवून देतोय. तुम्ही त्यांना रुपये पाच हजारची देणगी पाठवा आणि पावती मला द्या. वेगळे काही नको. फार तर तुमच्या बागेतील ताजी १ किलो द्राक्षे वानोळा म्हणून द्या.”

त्यांनी ताबडतोब संमती दिली. कार्यक्रमाचे कन्फरमेशन झाले.

ठरलेल्या दिवशी मी नाशिकला गेलो. नाशिकच्या सीबीएस (एस टी स्टँड) वर मला घ्यायला अध्यक्षांची मर्सिडीज आली होती. त्यांनी माझी राहण्याची व्यवस्था एका आलिशान हॉटेलमध्ये केली होती. माझ्या रूममध्ये फलटणचे एक अब्जाधीश नेतेही होते.

दुसऱ्या दिवशी सकाळी पाहतो तर नाशिकच्या सगळ्या वर्तमान पत्रांमध्ये पहिले पान भरुन कार्यक्रमाची जाहिरात छापलेली. मंत्री व पदाधिकारी यांचे मोठमोठे फोटो छापलेले. माझे प्रमुख वक्ते म्हणून नाव छापलेले. फोटो मिळाला नाही असे आयोजक म्हणाले. खरंतर त्यांनी माझ्याकडे फोटो मागितलाच नव्हता. असो.

फोटोचे एव्हढे काय? आपण थोडेच राजकीय पुढारी आहोत? आपण सामाजिक कार्यकर्ते.

किमान तीनचार लाख रुपये सातआठ वृत्तपत्रांच्या जाहिरातीवर त्यांनी खर्च केलेला असावा. माझा जीव दडपून गेला.

युती सरकारमधले तत्कालीन मंत्री दौलतराव अहेर, बबनराव घोलप आणि तुकाराम दिघोळे रीतीप्रमाणे तासभर उशीरा आल्याने कार्यक्रम उशिरा सुरू झाला. नाट्यगृह सुंदर सजवलेले. रस्त्यावर मोठमोठ्या स्वागत कमानी. स्टेजवर बदाम, पिस्ते, काजू, बर्फी अशी रेलचेल होती. समाजातील श्रीमंत वधुवरांची सूची प्रकाशित करण्यासाठी चारपाचशे लग्नाळूकडून प्रत्येकी दोन हजार रुपये आयोजकांनी जमा केलेले. एकूण तामझाम फाऊव्ह स्टार होता.

नाशिकचे प्रतिभावंत युवा संगीतकार संजय गीते यांनी सादर केलेले स्वागतगीत अविस्मरणीय होते. कार्यक्रमाची सुरुवात तर अप्रतिम झालेली. पण स्टेजच्या मागे गायकांच्या मानधनावरून वाद चालू असल्याचे ऐकायला येत होते. बऱ्याच वेळाने ते प्रकरण मिटले असावे. ठरलेले मानधन त्वरित द्या असे गायक, वादक म्हणत होते नि संयोजक आम्ही काय पळून चाललोय का म्हणून भांडत होते.

मंत्र्यांची भाषणे औपचारिक होती. प्रमुख भाषण माझेच होते. दुसऱ्या दिवशी सगळ्या पेपरात रंगीत फोटोसह मोठमोठ्या बातम्या होत्या. मंत्री आणि पदाधिकारी काय म्हणाले त्यावर फोकस होता. याप्रसंगी हरी नरके यांचेही भाषण झाल्याचा उल्लेख बातमीत होता.

दुसऱ्या दिवशी फलटणचे अब्जाधीश पहाटेच निघून गेले. मला परतीचे तिकीट व द्राक्षे आणि लोखंडे प्रतिष्ठानला देणगी पोचवल्याची पावती द्यायला अध्यक्ष व सेक्रेटरी सकाळी येणार होते.

बराच वेळ वाट बघून मी त्यांना फोन केला. तर एकाने फोनच घेतला नाही. दुसरे म्हणाले, ” मी खूप थकलोय. शिवाय आमच्या फार्म हाऊसवरून हॉटेलवर येण्यात वेळ जाईल. तुम्ही रिक्षा घ्या आणि सीबीएसवर जा. कार्यक्रमाच्या गडबडीत आम्ही तुमच्यासाठी एशियाडचे रिझर्व्हेशन करू शकलो नाही. तशीही सध्या गर्दी नसणार. सहज जागा मिळेल. आम्ही प्रवासाचे पैसे व देणगीची पावती पोस्टाने पाठवतो. आम्ही प्रतिष्ठित लोक आहोत.तुमचे पैसे बुडवून आम्हाला काय मिळणार?”

म्हणजे वानोळा द्राक्षे बोंबलली. आपण त्याची आठवण देणार कशी ना? ते बरे दिसणार नाही.

मी चेकआऊट करतोय म्हटल्यावर हॉटेलने भले मोठे बिल हातावर टेकवले. त्यात जेवण, चहा, नाष्टा, रुमभाडे यांच्यासह फलटणच्या अब्जाधीशांनी केलेले एसटीडी कॉल यांचेही भरमसाठ बिल होते.

मी पुन्हा अध्यक्षांना फोन केला तर त्यांची बायको म्हणाली, “सारखेसारखे काय फोन करता? ते कामात आहेत.”

बिलाचे सांगितले तर अध्यक्ष अत्यंत सहजपणे म्हणाले, “भरून टाका ना बिल. मला काय विचारता? तुमचाच खर्च आहे ना तो?”

मी खरं तर खूप संतापलो होतो. हे बागायतदार ति*के, मला निमंत्रण द्यायला ३०-३५ जण नाशिकहून पुण्याला आलेले. नको तिथे पैसे उधळलेले नी मला सांगतात तुमचे हॉटेलचे बिल तुम्हीच भरा. भरलेही असते पण माझी ऐपतच नव्हती. शिवाय फलटणच्या अब्जाधीशांच्या ट्रंककॉलचे पैसे मी का द्यायचे? त्यांना काही मी बोलावलेले नव्हते.

मी भडाभडा बोललो. तर ते म्हणाले, “ठीक आहे, ते आमच्या समाजातले मोठे नेते आहेत. त्यांचे पैसे आम्ही भरू. तुमचे तुम्ही द्या.”

माझ्याकडे एव्हढे पैसेच नव्हते. शिवाय त्या काळात कार्ड वगैरे भानगडी माझ्या आवाक्यातल्या नव्हत्या.

मी म्हणालो, “मी साध्या हॉटेलमध्ये राहिलो असतो. मला हा एव्हढा खर्च परवडणारा नाही. शिवाय मला तुम्ही बोलावले म्हणजे निवास, भोजन व्यवस्था ही तुमची जबाबदारी आहे.”

मग ते मेहरबानी केल्याच्या आवाजात म्हणाले,” ठीक आहे आम्ही भरतो. आम्हाला काय भिका लागलेल्या नाहीत. माझी २०० एकर द्राक्षे आहेत. शिवाय माझा वाईन बनवण्याचा व्यवसाय आहे. माझे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत चारचार गाळे आहेत…..”

तर एकदाची माझी हॉटेलमधून बिल न भरता सुटका झाली.

त्यांनी ना प्रवासखर्च पाठवला ना लोखंडे प्रतिष्ठानला देणगी दिली. मी त्यांना पत्र लिहिले तर त्यांनी उत्तर सोडा, पोचही दिली नाही. मग मी रजिस्टर पत्र लिहिले आणि नाशिकच्या पेपर्समध्ये यावर लिहितो अशी धमकी दिली. तर त्यांचे उत्तर आले. “या कार्यक्रमातून आम्हाला फारसा फायदा झाला नाही. निदान पाचेक लाख सुटतील असा आमचा अंदाज होता. पण तेव्हढी कमाई झाली नाही. तुम्ही नंतर मुक्त विद्यापीठाच्या बैठकीला गेला होतात, त्यांनी तुम्हाला प्रवास खर्च दिलाच असेल.”

“आमचा ट्रस्ट असल्याने आम्ही कुणालाही देणग्या देऊ शकत नाही. काय लिहायचे पेपरात ते लिहा. आम्ही घाबरत नाही. शिवाय लाखो रुपयांच्या जाहिराती आम्ही त्यांना दिल्या होत्या, कुणीच तुमचा लेख छापणार नाहीत.”

एक संपादक माझे मित्र होते. मी त्यांना ह्या हकिगतीचा लेख पाठवला. ते छापतो म्हणाले.
पण मी एक चूक केली, लेख छापून येणार असल्याचे एका मित्राला बोललो. तो नेमका अध्यक्षांचा भाचा होता हे मला माहीत नव्हते. मग वेगाने हालचाली झाल्या. लोखंडे प्रतिष्ठानला देणगी पाठवली गेली. मला एसटी भाड्याचे ₹२०० एमओद्वारे पाठवले गेले.

मग मी लेख छापू नका अशी संपादक मित्राला विनंती केली.

पण वानोळा म्हणून एक किलो ताजी द्राक्षे मात्र गेल्या २६ वर्षात मला मिळाली नाहीत. ती एकूण आंबटच असणार!

नाशिकला मी नंतर अनेक कार्यक्रम केले. असा वाईट अनुभव पुन्हा कधीही आला नाही. उलट अनेक संयोजक आप्त मित्र म्हणून जोडले गेले. त्यांचा पाहुणचार हा आजही अतिशय आनंददायी असतो. सगळेच काही असे तिरके-चिडके बागायतदार आणि वाईनवाले असत नाहीत.. : प्रा. हरी नरके

 

 

#

Comments are closed

error: Content is protected !!