सांगवी,दि.३१:- सनराइज् मेडिकल फाउंडेशन संस्थेच्या वतीने आज दिव्यांग व्यक्तींना एक मदतीचा हात म्हणून एक निशुल्क स्वतंत्र कक्ष सुरू करण्यात आला.
औंध जिल्हा रुग्णालयामध्ये जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून दिव्यांग व्यक्ती अपंगत्वाचा दाखला घेण्यासाठी येत असतात त्यांना असंख्य अडचणींना सामोरे जावे लागते तसेच हॉस्पिटलच्या आवारात असलेले एजंट दिव्यांगांना चुकीची माहिती देऊन तसेच त्यांची दिशाभूल करून पैशांची मागणी करतात. या सर्व गोष्टींना आळा बसून त्यांची मदत व्हावी म्हणून आज हा स्वतंत्र कक्ष जिल्हा रुग्णालयात सुरू करण्यात आला आहे.
संस्थेच्या वतीने सांगण्यात आले की हा कक्ष निशुल्क आहे. कुठल्याही प्रकारचे मानधन येथे स्वीकारले जाणार नाही व दिव्यांग नागरिकांना संपूर्ण मदत केली जाईल.
सनराइज् मेडिकल फाउंडेशन प्रवक्ते संजय मराठे म्हणाले की “ही संस्था आरोग्य क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. संस्थेच्या माध्यमातून गोरगरीब व गरजू रुग्णांना किडनी प्रत्यारोपण, लिव्हर प्रत्यारोपण, कॅन्सर, सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया व लहान मुलांच्या हृदयामध्ये छिद्र असणाऱ्या शस्त्रक्रिया अशा अनेक प्रकारच्या दुर्धर आजार असलेल्या रुग्णांचे सर्व प्रकारचे उपचार संस्थेच्या माध्यमातून मोफत केले जातात. संस्थेच्या माध्यमातून महाराष्ट्रभर मोठमोठ्या महाआरोग्य शिबिरांचे आयोजन देखील केले जाते तसेच अति दुर्गम भागातील खेड्यांमध्ये मोफत आरोग्य सेवा व मोफत औषधोपचार संस्थेच्या माध्यमातून केला जाईल.”
यावेळी सनराइज् मेडिकल फाउंडेशन या संस्थेने दिव्यांग व्यक्तींसाठी ७७६८००३५३५ हा हेल्पलाइन नंबर देखील जाहीर केला आहे.
या उद्घाटनाप्रसंगी सनराइज् मेडिकल फाउंडेशनचे प्रवक्ते संजय मराठे, जिल्हा चिकित्सालय अधीक्षक डॉ.वर्षा डोईफोडे, संस्थेच्या वतीने काम पाहणारे प्रशांत शिंदे, रोहन शिंदे, सामाजिक कार्यकर्ते अजय मोरे, वैभव आवटे, योगेश सोनवणे, हर्षद साबळे, इम्रान इनामदार व दिव्यांग बांधव उपस्थित होते.
Comments are closed