“जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा”

महाराष्ट्राच्या राज्यगीता संबंधीचे निर्देश

१. महाराष्ट्रातील नागरिक आणि विशेषतः तरूण वर्गासाठी स्फुर्तीदायक असणारे तसेच महाराष्ट्राच्या शौर्याचे वर्णन करणारे अस्मितादर्शक असे, ‘जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा’ हे गीत राज्याचे अधिकृत राज्यगीत म्हणून स्वीकृत करण्यात आले आहे.

२. ‘जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा’ या गीताचे गीतकार कविवर्य राजा निळकंठ बढे आणि मूळ संगीतकार श्रीनिवास खळे असून मूळ गीत शाहीर कृष्णराव साबळे यांनी गायले आहे.

महाराष्ट्राचे राज्यगीत म्हणून स्वीकृत करण्यात आलेल्या दोन चरणांचे संगीत संयोजन कमलेश भडकमकर यांनी केले असून अवधूत गुप्ते, नंदेश उमप, गणेश चंदनशिवे आणि वैशाली भैसने माडे यांनी ते गायले आहे. –

स्वीकृत करण्यात आलेले राज्यगीत

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥धृ॥ भिती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा अस्मानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिव शंभू राजा दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥ १ ॥

काळ्या छातीवरी कोरली, अभिमानाची लेणी पोलादी मनगटे खेळती, खेळ जीवघेणी दारिद्र्याच्या उन्हात शिजला निढळाच्या घामाने भिजला दिल्लीचे ही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा ॥ २ ॥

देश गौरवासाठी झिजला

दिल्लीचे ही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा ॥ २ ॥

३. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षामध्ये दिनांक १९ फेब्रुवारी, २०२३ पासून सदर गीत महाराष्ट्राचे राज्यगीत म्हणून अंगिकारण्यात आले आहे. हे राज्यगीत सुमारे १०० ते १०५ सेकंदामध्ये वाजविता / गाता येईल.

४. राज्यगीत गायन / वादन या संदर्भात औचित्याचे पालन करणे आवश्यक ठरते. त्यासाठी खालील मार्गदर्शक सूचनांचे अनुपालन करण्यात यावे.

● शासनाने राज्यगीत अंगिकारण्याचा निर्णय घेतला असला तरीही, राष्ट्रगीताचा मान, सन्मान व प्रतिष्ठा कायमच सर्वोच्च राहील.

१ मे महाराष्ट्र दिनी ध्वजारोहणानंतर राष्ट्रगीत होताच राज्यगीत वाजविले / गायिले जाईल.

शासनाच्या सर्व सार्वजनिक कार्यक्रमात सुरुवातीस राज्यगीताचे गायन वादन हे ध्वनीमुद्रीत आवृत्तीसोबत अथवा स्वतंत्रपणे करण्यात यावे.

राज्यातील शाळांमध्ये दैनिक सत्र सुरु होण्यापूर्वी, राष्ट्रगीत / परिपाठ / प्रार्थना / प्रतिज्ञा यासोबत राज्यगीत वाजविले / गायले जाईल.

• राज्यातील सर्व शैक्षणिक संस्था, सर्व प्रकारच्या अशासकीय संस्था, स्वयंसेवी संस्था, खाजगी आस्थापना तसेच सर्व नागरीकांना सांस्कृतिक, सामाजिक आणि क्रीडाविषयक कार्यक्रम इत्यादी मध्ये राज्यगीताचा योग्य तो सन्मान राखून ते वाजविण्यास/ गाण्यास मुभा राहील.

राज्यगीत सुरु असतांना सर्वांनी सावधान स्थितीत उभे राहावे व राज्यगीताचा सन्मान करावा. लहान बालके, गरोदर स्त्रिया, आजारी व्यक्ती, दिव्यांग व्यक्ती तसेच वृध्द व्यक्ती यांना सावधान उभे राहण्यापासून सूट असेल.

• राष्ट्रगीताबाबतीत जसे तारतम्य बाळगण्यात येते, तसेच ते राज्यगीताच्या बाबतीत सुध्दा बाळगण्यात यावे. हे गीत वाजविताना / गाताना त्याचा योग्य तो सन्मान राखण्यात यावा.

वाद्यसंगीतावर आधारीत या गीताची वाद्यधून पोलीस बँडमार्फत वाजविता येईल.

→ या राज्यगीताची लिंक राज्य शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

या संदर्भातील शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला आहे.

 

 

Sorry, there are no polls available at the moment.

 

 

 

 

 

 




 

 

 

 

 

#

Comments are closed

error: Content is protected !!