पुणे दि. २३(punetoday9news):- कोरोना सारख्या महामारीत पुणे शहरात वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर्स, परिचारिका, रुग्णालयातील अन्य कर्मचारीवर्ग चांगले काम करत आहेत. पुण्याचे वैद्यकीय क्षेत्रातील महत्त्व टिकविण्यासाठी तसेच भविष्यातील कोरोना रुग्णांची वाढणारी संख्या लक्षात घेवून आयसीयू खाटा तसेच कृत्रिम श्वसनयंत्रेयुक्त (व्हेंटिलेटर) खाटा उपलब्ध करण्यासाठी सर्वांनी मिशन मोडवर काम करण्याचे आवाहन विभागीय आयुक्त कार्यालयाचे विशेष कार्य अधिकारी सौरभ राव यांनी केले.
विभागीय आयुक्त कार्यालयात आज विशेष कार्य अधिकारी सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यातील प्रमुख रुग्णालयांचे व्यवस्थापक, संचालक व डॉक्टरांसोबत उपाययोजनाबाबत बैठक घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. बैठकीला जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या आयुक्त पवनीत कौर, पोलीस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, ससून हॉस्पिटलचे प्र.अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे, प्रमुख डॉक्टर उपस्थित होते.
विशेष कार्य अधिकारी सौरभ राव यांनी सुरुवातीला पुणे शहरातील कोरोना परिस्थतीच्या अनुषंगाने देश व राज्य पातळीवरील तुलनात्मक तक्ता, वाढत जाणारी कोरोनाबाधित रुग्णसंख्या, त्यादृष्टीने खासगी रुग्णालयातील उपलब्ध आयसीयू तसेच कृत्रिम श्वसनयंत्रेयुक्त (व्हेंटिलेटर) खाटांची संख्या, बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण, मृत्यूदर, रुग्णालयातील उपलब्ध मनुष्यबळ इत्यादी बाबत सादरीकरणाद्वारे माहिती दिली.
टाळेबंदीच्या काळात मोठ्या प्रमाणावर कोरोना चाचणीच्या क्षमतेत वाढ केल्यामुळे कोराना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. वाढत्या रुग्णसंख्येच्या दृष्टीने रुग्णांप्रती पर्यायाने शहराप्रती आपली जबाबदारी आणि उत्तरदायित्व लक्षात घेवून प्रत्येक रुग्ण कोरोना मुक्त कसा बरा होईल, याकडे विशेष लक्ष द्यावे. रुग्णालयात येणारे प्रत्येक व्यक्ती कोरोना बाधित रुग्ण आहे असे समजूनच त्यावर उपचार करावे. खासगी रुग्णालयांनी कोरोना बाधित रुग्णाच्या उपचारांती देण्यात येणाऱ्या अवाजवी वैद्यकीय देयकावर नियत्रंण आणावे, रुग्णालयातील उपलब्ध खाटा गरजू रुग्णांना देण्याबाबत प्राधान्याने विचार करावा. सहव्याधी रुग्णांवर प्राधान्याने उपचार करुन मृत्यूदर कमी करण्यासाठी प्रयत्न करावे. रुग्णालयातील पायाभूत सुविधा भक्कम करण्यावर भर द्यावा, अशा सूचनाही विशेष कार्य अधिकारी श्री. राव यांनी दिल्या.
पुण्यातील खाजगी रुग्णालयांचे व्यवस्थापक, पदाधिकारी व प्रमुख डॉक्टर उपस्थितांनी कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करण्याबाबत प्रशासनाला सहकार्य करण्याचे आश्वासन यावेळी दिले.
Comments are closed