पुणे,दि.१५ :- चिंचवड विधानसभा मतदार संघ निवडणूक निरीक्षक एस.सत्यनारायण आणि कसबा पेठ विधानसभा मतदारसंघ निवडणूक निरीक्षक नीरज सेमवाल यांच्या प्रमुख उपस्थितीत आज जिल्हाधिकारी कार्यालयात संवेदनशील मतदान केंद्रांसाठी नियुक्त करण्यात आलेल्या सूक्ष्म निरीक्षकांचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले.

यावेळी उप जिल्हा निवडणूक अधिकारी आरती भोसले, उपजिल्हाधिकारी वनश्री लाभशेटवार, समन्वय अधिकारी तथा सहायक पशुसंवर्धन आयुक्त डॉ.प्रशांत धर्माधिकारी, सहायक आयुक्त डॉ.स्वप्नील शिंदे, बँक ऑफ महाराष्ट्राचे मुख्य प्रबंधक श्रीकांत कारेगांवकर आदी उपस्थित होते.

निवडणूक निरीक्षक निरज सेमवाल आणि एस.सत्यनारायण यांनी यावेळी सूक्ष्म निरीक्षकांना मार्गदर्शन केले. मतदान केंद्रांवर उमेदवार प्रतिनिधी, मतदान अधिकारी, केंद्र सहायक, मतदार सर्व नियम पाळतात का यावर सूक्ष्म निरीक्षकांनी लक्ष द्यावे. मतदान केंद्रावर सूक्ष्म निरीक्षक यांची भूमिका महत्त्वाची असल्याने त्यादृष्टीने पार पाडावयाच्या जबाबदारीबाबत संबंधितांनी सर्व नियमांची माहिती करुन घ्यावी, असे त्यांनी सांगितले.

यावेळी उप जिल्हा निवडणूक अधिकारी आरती भोसले यांनी निवडणूक प्रक्रियेविषयी माहिती दिली. म्हणाल्या, निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार निवडणूक यंत्रणेद्वारे मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यात सूक्ष्म निरीक्षकांची भूमिका महत्त्वपूर्ण असून त्यादृष्टीने सर्वांनी लक्षपूर्वक आपली जबाबदारी पार पाडावी.

मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी सूक्ष्म निरीक्षक हा निवडणूक निरीक्षकांच्यावतीने मतदान केंद्रांवर काम पाहत असतो. मतदान केंद्रांवर सुरक्षीतपणे मतदान प्रक्रिया पार पाडण्याच्या अनुषंगाने सर्व बाबींचा अहवाल सूक्ष्म निरीक्षकांनी निवडणूक निरीक्षकांकडे सादर करावयाचा आहे.

सूक्ष्म निरीक्षकांना निवडणूक प्रक्रियेचे योग्य ज्ञान असणे आवश्यक आहे. ज्या बाबींवर निरीक्षण करायचे आहे त्या बाबींची आणि निवडणूक आयोगाला विहीत नमुन्यात सादर करावयाच्या अहवालाची परिपूर्ण माहिती संबधितांनी घ्यावी, असे त्यांनी सांगितले.

मतदान प्रक्रियेची गोपनीयता जपणे, निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानूसार योग्य पद्धतीने मतदारांची ओळख पटवणे, मतदान केंद्रावरील अन्य व्यवस्थेसह प्रवेश पास व्यवस्था, उमेदवारांचे पोलींग एजंट, मतदाराच्या बोटावर शाई व्यवस्थित लावली जात आहे का? तसेच मतदान केंद्रावर कोणत्याही नियमबाह्य गोष्टी घडत नाहीत याबाबत सर्वांनी दक्ष राहून आयोगाने निर्देशित केलेल्या सर्व बाबींवर बारकाईने लक्ष देण्यासंदर्भात उपजिल्हाधिकारी श्रीमती लाभशेटवार यांनी उपस्थित सूक्ष्म निरीक्षकांना माहिती दिली. यावेळी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राद्वारे मतदान प्रक्रियेचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले.

 

 

 




 

 

 

 

#

Comments are closed

error: Content is protected !!