पिंपरी, दि. १५:-  तुमच्या नावापुढे आजही स्वर्गीय, जंयती असे शब्द लावताना काळीज जड होते. तुम्ही, तुमचे कार्य, तुमचा संघर्ष आणि तुमचे विचार आजही आमच्या अवतीभवती आहेत. तुम्ही पिंपरी-चिंचवडच्या विकासासाठी केलेले काम कधीही विसरता येणार नाही. तुम्ही अजूनही आमच्यात आहात, अशा शब्दांत डोळ्यात अश्रू अनावर झालेल्या अश्वनी लक्ष्मण जगताप यांनी त्यांचे पती व दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांना जयंतीनिमित्त अभिवादन केले.

पिंपरी-चिंचवडचे लोकनेते लक्ष्मण जगताप यांचे ३ जानेवारी रोजी निधन झाले. १५ फेब्रुवारी हा दिवस त्यांचा जन्मदिवस. त्यानिमित्त बुधवारी त्यांची जयंती साजरी करण्यात आली. विविध राजकीय पक्ष, संघटनांकडून पिंपळेगुरव येथील स्मृतीस्थळावर जाऊन दिवंगत लक्ष्मण जगताप यांना अभिवादन केले. संपूर्ण जगताप कुटुंबानेही स्मृतीस्थळावर जात त्यांना अभिवादन केले. सध्या चिंचवड विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक सुरू आहे. भाजपने दिवंगत लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी लक्ष्मण जगताप यांना उमेदवारी दिली आहे. पतीच्या निधनाला ५० दिवसही पूर्ण झालेले नसताना अश्विनी जगताप दुःख बाजूला सारून निवडणूक लढवत आहेत.

पतीला अग्नी दिल्यानंतर आता निवडणूक प्रचारातच त्यांची जयंती साजरी करण्याची वेळ अश्विनी लक्ष्मण जगताप यांच्यावर आली आहे. त्या संपूर्ण जगताप कुटुंबासोबत बुधवारी सकाळी पतीच्या स्मृतीस्थळावर गेल्या. तेथे डोके टेकवून त्यांनी आपल्या अश्रूला वाट मोकळी करून दिली. डोळ्यात अश्रूंसोबत हात जोडून त्यांनी पती लक्ष्मण जगताप यांना अभिवादन केले.

तुमच्या नावापुढे आजही स्वर्गीय, जयंती असे शब्द लावताना काळीज जड होते. तुम्ही, तुमचे कार्य, तुमचा संघर्ष आणि तुमचे विचार आजही आमच्या अवतीभवती आहेत. तुम्ही पिंपरी-चिंचवडच्या विकासासाठी काम केले. प्रसंगी कुटुंबाकडे दुर्लक्ष केले. तुम्ही केलेले काम कधीही विसरता येणार नाही. तुम्ही अजूनही आमच्यात आहात. त्याच प्रेरणेतून मी दीनदुबळ्यांची, वंचितांची, गरजूंची सेवा करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार आहे, अशा शब्दांत अश्वनी लक्ष्मण जगताप यांनी आपल्या दिवंगत पतीला अभिवादन केले.

 

 

 

 

 

 

 

 




 

#

Comments are closed

error: Content is protected !!