हडपसर, दि.२१ :- पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे खजिनदार मोहन देशमुख आणि विधी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. रंजना पाटील यांनी महाविद्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य पुतळ्यास पुष्प हार वाहून अभिवादन केले.
तसेच महाविद्यालयीन विद्यार्थिनींनी शिवरायांचे पाळणा गीत सादर करून कार्यक्रमाची शोभा वाढविली.
विधी महाविद्यालय, हडपसर येथील विद्यार्थी विद्यार्थिनींसह राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी महाविद्यालय परिसरात ढोल-ताशाच्या निनादात शोभायात्रा काढली. भगवे फेटे, शुभ्रवस्त्रांकित तरुणाईमुळे ही शोभायात्रा लक्षवेधी ठरली. शोभायात्रा महाविद्यालयाच्या मुख्य इमारतीसमोर आल्या नंतर विविध कलाविष्कारांचे सादरीकरण केले. यामध्ये शिवरायांचे पाळणा गीत, शोभयात्रा,ढोलपथकाचे सादरीकरण, ध्वज नाचविण्याचा उपक्रम, हलगीचा तालमय वातावरण, महाराजांच्या मूर्तीची रथामध्ये मिरवणूक इत्यादी उपक्रमांचा समावेश होता.
त्यानंतर सदरील शिवजयंती उत्सवाचे प्रास्ताविक सादर करताना महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. रंजना पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रापासून प्रेरणा घेऊन, त्यांनी दाखविलेल्या मार्गावरुन आपल्याला वाटचाल करावयाची आहे याचे भान बाळगून तरुणांनी देशहितासाठी स्वतःस तयार करावे, असे आव्हान उपस्थित विद्यार्थ्यांना केले.
यानंतर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन चरित्रावर आधारित विचार व्यक्त केले.
प्रमुख पाहुणे म्हणुन लाभलेले अमित गायकवाड (आद्य प्रवर्तक संस्थापक अध्यक्ष शिवजयंती महोत्सव समिती, पुणे.) यांनी सखोल शिवचरित्र व शिवचरित्राची आजच्या काळातील आवश्यकता या विषयावर उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
सदरील कार्यक्रमाचे अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे खजिनदार मोहन देशमुख यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी खऱ्या अर्थाने धर्म निरपेक्ष आणि सर्व सामान्य रयतेचे राज्य निर्माण केल्याचे सांगून त्यांनी निर्माण केलेली राज्य व्यवस्था आजही जगातील सर्व राष्ट्रांना प्रेरणा देणारी असल्याचे सांगितले.
तसेच या कार्यक्रमात एक आगळी वेगळी संकल्पना मांडत ‘जो समाजासाठी, समाज त्यांच्यासाठी ‘ उपक्रमांगत विधी महाविद्यालयाच्या स्वच्छता सहाय्यक यांचे सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आशुतोष कोलते आणि श्वेता कुंजीर यांनी केले व आभार प्रदर्शन सुहास कानगुडे यांनी व्यक्त केले.
शिवजयंती उत्सव यशस्वी पार पाडण्यासाठी महाविद्यालयातील सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.सनोबर काझी, प्रा. किरण जाधव, प्रा.सीमा वावरे, प्रा.मयूर कोळेकर, प्रा.संतोष सुतार, वैशाली बहिरट, किशोर इंगळे, सर्व विद्यार्थी प्रतिनिधी आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
Comments are closed