पुणे दि. २४( punetoday9news):- पिंपरी -चिंचवड येथील उप प्रादेशिक परिवहन या कार्यालयात लवकरच चारचाकी वाहनांसाठी नवीन मालिका सुरु करण्यात येत आहे. वाहनांची नवीन मालिका चालू होण्याच्या दिवशी उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, पिंपरी-चिंचवड (नवीन इमारत, मोशी) येथे मोठ्या प्रमाणावर इच्छुकांची गर्दी होते व त्यामुळे कार्यालयीन व्यवस्थेवर त्याचा ताण पडतो व ब-याचवेळा नागरिकांनाही याचा त्रास होतो. नागरिकांचा होणारा त्रास कमी व्हावा व त्यांना हवा असणारा आकर्षक नोंदणी क्रमांक उपलब्ध असल्यास त्यांना सुलभतेने तो मिळावा, यासाठी ज्या चारचाकी वाहन मालकांना नव्याने सुरु होणा-या चारचाकी मालिकेतील आकर्षक तसेच पसंतीचे क्रमांक विहित शुल्क भरुन हवे असतील त्यांनी २९ जुलै २०२० रोजी कार्यालयीन वेळेत स. ११ ते दु. २.३० या दरम्यान विहित नमून्यात अर्ज करावा. अर्ज कार्यालयाच्या नवीन नोंदणी विभागात डीडी. पत्त्याचा पुरावा. आधार कार्ड, ओळखपत्र. पॅनकार्डच्या साक्षांकित प्रतीसह जमा करावा. सदर डीडी DY.R.T.O.PIMPRI CHINCHWAD यांच्या नावे नॅशनलाईज/ शेडयुल्ड बँक पुणे येथील असावा.
अर्जदाराची ओळख पटविण्यासाठी अर्जासोबत अर्जदाराने त्याचे फोटो ओळखपत्र (उदा. आधारकार्ड, टेलिफोन बील इत्यादी) साक्षांकित प्रत सादर करणे आवश्यक असेल.
चारचाकीची यादी ३० जुलै २०२० रोजी कार्यालयीन नोटीस बोर्डवर लावण्यात येईल. यादीतील अर्जदारांना लिलावाकरीता जर जास्त रकमेचा डीडी जमा करावयाचा असेल तर त्यांनी दिनांक ३० जुलै २०२० रोजी दु.२.३० पर्यंत सीलबंद पाकिटात कार्यालयात जमा करावा व त्याच दिवशी दु.३.३० वा. उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांचे कक्षात उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांचे उपस्थितीत पात्र व्यक्तीसमोर (संबंधीत अर्जदार लिफाफे उघडून ज्या अर्जदाराने विनिर्दीप्ट शुल्कापेक्षा जास्तीत जास्त रकमेचा डीडी सादर केला असेल त्यास नमूद पसंती क्रमांक वितरीत केला जाईल.
एकदा राखून ठेवलेला नोंदणी क्र. बदलून देता येणार नाही. नोंदणी क्रमांक राखून ठेवलेल्या दिनांकापासूून ३० दिवसांच्या आत नोंदणीसाठी वाहन सादर केले नाही तर राखून ठेवलेला नोंदणी क्रमांक आपोआप रदद होईल व फी सरकार जमा होईल. कोणताही विशिष्ट नोंदणी क्रमांक राखीव ठेवण्यासाठी प्रदान केलेली फी, कोणत्याही परिस्थितीत परत करता येणार नाही अथवा त्याचे समायोजन करता येणार नाही, असेही पुणे पिंपरी -चिंचवडच्या उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाने प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
Comments are closed