● अंतिम टप्प्यातील कामाचे योग्य नियोजन करण्याचे निर्देश.
पुणे दि.१५:- जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी एनडीए चौकात (चांदणी चौक) राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातर्फे करण्यात येत असलेल्या उड्डाणपूल आणि रस्त्याच्या कामांची पाहणी केली. चौकात होत असलेल्या अंतिम टप्प्यातील कामाचे योग्य नियोजन करण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.
यावेळी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक संजय कदम, उपव्यवस्थापक अंकित यादव, प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे, एनएचएआय सल्लागार अभियंता भारत तोडकरी, एनडीए चौकातील कामाचे एनसीसी कंपनीचे प्रकल्प व्यवस्थापक श्रीनिवास आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ.देशमुख यांनी मुळशी ते मुंबई, एनडीए ते मुंबई, बावधन ते कोथरूड आणि मुळशी ते सातारा मार्गाची पाहणी केली. मुळशीकडे जाणाऱ्या अंडरपासच्या कामाचीही त्यांनी माहिती घेतली. जुन्या पाडलेल्या पुलाच्या ठिकाणी नवीन पूल उभारण्याचे काम वेगाने करण्यात यावे. त्यासाठी गर्डर टाकण्याचे काम करताना वाहतूकीचे योग्य नियोजन करण्यात यावे. नागरिकांना काम सुरू करण्यापूर्वी पर्यायी वाहतूक मार्गाची माहिती देण्यात यावी, असे निर्देश त्यांनी दिले.
जिल्हाधिकाऱ्यांनी ‘सेव्ह लाईफ’च्या शिफारसीच्या अनुषंगाने करण्यात येत असलेल्या उपाययोजना, नवले पुलावरील अपघात कमी करण्यासाठी करण्यात येत असलेली कामे, पालखी मार्गाचे दिवे घाटातील काम आदीविषयीदेखील अधिकाऱ्यांशी चर्चा केली. दिवे घाटातील कामास लवकर सुरूवात करावी, असे त्यांनी सांगितले.
*एनडीए चौकातील काम अंतिम टप्प्यात*
एनडीए चौकातील वाहतूक सुरूळीत करण्यासाठी करण्यात येत असलेले काम अंतिम टप्प्यात असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. सद्यस्थितीत प्रकल्पाचे ८६ टक्के काम पूर्ण झाले असून मे २०२३ पर्यंत सर्व कामे पूर्ण करण्याचे नियोजन असल्याचे कदम यांनी यावेळी सांगितले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ऑगस्ट अखेर चांदणी चौक उड्डाणपूल प्रकल्पास भेट देऊन वाहतूक कोंडी टाळण्यासाठी जूना पूल पाडण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार जिल्हाधिकारी डॉ.देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली २ ऑक्टोबर रोजी स्फोटकाद्वारे हा पूल पाडण्यात आला व मुंबई तसेच बंगळूरूकडे जाणारी वाहतूक सुरळीत करण्यात आली होती.
कायमस्वरूपी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी १ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत नियोजन करण्यात आले. तेव्हापासून हे काम अत्यंत वेगाने करण्यात येत आहे. सध्या सेवा रस्त्यासाठी व इतर कामांसाठी एनडीए बाजूचे खडकाचे खोदकाम सुरू आहे. बावधन बाजूस नवीन पुलासाठी खांब उभारण्याचे काम पूर्ण झाले आहे. जुन्या पुलाच्या ठिकाणी मुंबई ते सातारा किंवा कोथरूडकडे जाण्यासाठी पाच आणि साताराकडून मुंबईकडे जाण्यासाठी तीन लेन अशा आठ मार्गिका वाहतूकीसाठी उपलब्ध आहेत. तसेच साताऱ्याकडून एनडीएमार्गे मुंबईला जाण्यासाठी अतिरिक्त दोन मार्गिकादेखील उपलब्ध आहेत.
बंगळूरू-मुंबई महामार्गावरील सहापदरीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. बावधनकडून साताऱ्याकडे जाणाऱ्या रॅम्प क्रमांक ६ चे काम पुढील १५ दिवसात पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. कोथरूड-श्रृंगेरीमठ-वारजेमार्गे साताराकडे जाणाऱ्या ४ पदरी सेवा रस्ता आणि एनडीए ते मुंबई रॅम्प क्र.५ चे काम पूर्ण झाले असून वाहतूकीसाठी हे रस्ते खुले करण्यात आले आहेत. मुळशी ते कोथरूड या रस्त्यावरील भुयारी मार्गाच्या रुंदीकरणाचे काम पुढील १५ दिवसात पुर्ण करण्यात येणार आहे. या मार्गावरील दोन्ही बाजूच्या भिंतींवर सुंदर चित्रे रंगविण्यात आली आहे.
मुळशी ते सातारा रॅम्पचे काम पूर्ण होत असून त्यावरून मुळशीकडून येणारी वाहतूक वळविण्यात आली आहे. मुळशी-मुंबई रॅम्पचे कामही पूर्ण झाले असून हा रस्तादेखील वाहतूकीसाठी खुला करण्यात आला आहे. बावधन ते पाषाणकडून कोथरूडकडे जाणाऱ्या सेवा रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे. मुंबईकडून कोथरूकडे जाणाऱ्या सेवा रस्त्याचे काम ८० टक्के पूर्ण झाले असून पुढील एका महिन्यात पूर्ण करण्यात येईल.
एनडीए सर्कल सुशोभिकरणाच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ.देशमुख यांनी दिल्या असून त्यासाठी आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यास एनडीएकडून सहमती मिळाली असून हे कामदेखील लवकरच सुरू करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
Comments are closed